सोशल मीडियावर वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ धक्कादायक असतात, तर काही व्हिडीओ मजेशीर असतात. अनेक प्राणी आपण त्यांच्याशी जसं वागतो तसंच ते आपल्याशी वागतात. त्यांच्यावर प्रेम केलं तर ते देखील आपणाला जीव लावतात. याबाबतचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. परंतु, प्राण्यांची खोड काढली तर मग ते देखील आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही तरुण एका हत्तीला चप्पल दाखवून त्याची खोड काढताना दिसत आहेत. तरुणांच्या या कृत्यामुळे हत्ती रागावतो आणि तो त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे येतो. यावेळी तो खाली पडण्यापासून थोडक्यात बचावला आहे.
हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी एक्स (ट्विटर) वर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “येथे खरा प्राणी कोण आहे ओळखा. नंतर हे आरोप करतात आणि त्यांना आपण मारेकरी म्हणतो. अशी कृत्ये जीवघेणी ठरू शकतात हे कधीही विसरू नका.” तर हा व्हिडीओ आसाममधील असल्याचं सांगितलं जात आहे. एक मिनिट आणि १० सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत ९४ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी तो लाईक केला आहे.
व्हिडीओमध्ये एक हत्ती डोंगराळ भागात खडकावर उभा असल्याचे दिसत आहे. यावेळी काही तरुण हत्तीची खोड काढतात. तरुणांचा एक गट हातात चप्पल घेऊन हत्तीला मुद्दाम चिथावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी ते त्याला घाबरवण्याचाही प्रयत्न करतात. तरुणांची ही कृती पाहून हत्तीही संतापतो आणि तो त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न करतो.
हत्ती रागवल्याचं दिसलं तरीही हे तरुण हत्तीला त्रास देणं बंद करत नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे हत्ती रागाच्या भरात पुढे धावून येत असताना तो खडकावरून खाली पडण्यापासून थोडक्यात बचावल्याचं दिसत आहे. त्यामुळे या तरुणांच्या चुकीच्या कृतीमुळे हत्तीचा मोठा अपघात होऊ शकला असता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी व्हिडीओतील तरुणांच्या कृत्यावर संताप व्यक्त करत आहेत.