Mahakumbh VIP Arrangements: मौनी अमावस्येचा मुहूर्त महाकुंभ मेळ्यात शाही स्नानासाठी पवित्र मानला जातो. या मुहूर्तावर स्नान करण्यासाठी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात एकाच दिवशी भाविकांची अलोट गर्दी लोटली होती. रात्रीच्या सुमारास काही भाविकांनी बॅरिकेट्स ओलांडून संगमा घाटाकडे कूच केल्यामुळे रस्त्यात झोपलेल्या लोकांच्या अंगावर पडून चेंगराचेंगरी झाली, त्यात ३० भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीनंतर योगी आदित्यनाथ सरकारने नवी नियमावली जाहीर केली असून व्हीव्हीआयपी पास रद्द केले आहेत. तसेच खासगी वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. मात्र तत्पूर्वी काही इन्फ्लुएंसरनी व्हीआयपी घाटाचे चित्रीकरण करून दाखविल्यानंतर आता संताप व्यक्त केला जात आहे.

तान्या मित्तल नामक एका इन्फ्लुएंसरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये मौनी अमावस्येनिमित्त प्रयागराजमध्ये गर्दी होणार असल्याचे म्हटले आहे. पण इथे व्हीव्हीआयपी घाटावर अजिबात गर्दी नसल्याचे ती सांगते. इथे चांगले वातावरण असून अजिबात गर्दी नाही, तसेच त्रिवेणी संगमचे पाणी या घाटावरदेखील येत असल्याचे ही इन्फ्लुएंसर सांगते. या घाटावर व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेसाठी बाऊन्सरही तैनात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

महाकुंभमेळ्यात व्हीआयपी, व्हीव्हीआयपी यांच्यासाठी विशेष व्यवस्था केल्याबाबत आता सोशल मीडियावर टीका होत आहे. अनेकांनी तान्या मित्तलचा व्हिडीओ शेअर केला असून त्यावर टीका केली आहे. प्रणव भारद्वाज नामक एका एक्स युजरने सदर व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. त्यानंतर अनेकांनी याखाली कमेंट करत व्हीआयपी संस्कृती नष्ट व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मंदिर आणि महाकुंभ सारख्या धार्मिक स्थळी तरी व्हीआयपी संस्कृती नको, असेही अनेकजण बोलत आहेत.

दुसऱ्या बाजूला आणखी एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सामान्य लोक ज्याठिकाणी घाटावर जाऊन आंघोळ करत आहेत, त्याठिकाणी कपडे बदलण्यासाठी जागा नसल्याची तक्रार केली जात आहे. विशेषतः महिलांची मोठी कुचंबणा होत असून त्यांना उघड्यावर कपडे बदलता येत नाहीयेत. त्याचवेळी थंड पाण्याने आंघोळ केल्यानंतर अडचणींचा सामना करावा लागतोय, अशी तक्रार केली जात आहे. याचेही अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दुसरीकडे व्हीआयपी घाटांवर महिलांना कपडे बदलण्याची विशेष सोय करण्यात आली आहे.

पण या दाव्याचा प्रतिवादही काही जणांनी केला आहे. प्रत्येक घाटावर कपडे बदलण्याची सोय केलेली असल्याचे फोटो काही जणांनी पोस्ट केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नदीवरील एका पुलावर मोठी गर्दी दिसत आहे. पूल पार करण्यासाठी एक व्यक्ती पुलाला असलेल्या रेलिंगच्या बाहेरून चालत आहे. अतिशय धोका पत्करलेल्या या व्यक्तीचाही व्हिडीओ काही भाविकांनी काढला असून या व्यक्तीला रेलिंगच्या आत जाण्याची विनंती केली जात आहे.