Maithili Thakur Bihar Election New Viral Video : गायिका मैथिली ठाकूर हिने अलीकडेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून तिला भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. भाजपाने मैथिली ठाकूरला दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. ती सध्या मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहे. मात्र, या प्रचारादरम्यान, प्रसामाध्यमांशी बोलताना केलेल्या चुकांमुळे मैथिली ठाकूर समाजमाध्यमांवर ट्रोल होत आहे.
मैथिली ठाकूरचा एक नवा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. एका पत्रकाराच्या प्रश्नावर तिने दिलेलं उत्तर ऐकून मैथिलीला ट्रोल केलं जात आहे. कारण मैथिलीला विकासाच्या ब्लू प्रिंटबाबत प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली, “मी ही गोष्ट कॅमेऱ्यासमोर कशी सांगू. ही खूप खासगी बाब आहे.” यासह तिने यावर बोलणं टाळलं.
मैथिली दावा करत होती की “मला संधी मिळाल्यास मी मतदारसंघाचा विकास करेन. बिहारसमोर अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी व स्थलांतरावर आपल्याला मात करायची आहे. यावर पत्रकाराने मैथिलीला विचारलं की तुमची ब्लू प्रिंट काय आहे? त्यावर मैथिली म्हणाली, “ही गोष्ट मी तुम्हाला कॅमेऱ्यासमोर कशी सांगू? ब्लू प्रिंट तर खूप खासगी बाब आहे. मी प्लॅन करतेय की…”
नेमकं काय घडलं?
मैथिली तिच्या मतदारसंघात प्रचार करत असताना एका पत्रकाराशी तिने बातचीत केली. यावेळी ती म्हणाली, “मला पाच वर्षे द्या, पाच वर्षांत मी मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकेन. पाच वर्षे दिल्यानंतर मला प्रश्न विचारा.” यावर तिला विचारण्यात आलं की तुमची ब्लू प्रिंट काय आहे? त्यावर मैथिली म्हणाली, “ही गोष्ट मी तुम्हाला कॅमेऱ्यासमोर कशी सांगू? ब्लू प्रिंट तर खूप खासगी बाब आहे. मी प्लॅन करतेय की…”
यावर तिला सांगण्यात आलं की ब्लू प्रिंट हा धोरणाचा भाग आहे. यावर ती म्हणाली, “आमचा जाहिरनामा आधीच प्रसिद्ध झाला आहे. ब्लू प्रिंटची आम्ही अंमलबजावणी कशी करणार हा प्रश्न आहे. ते मी आत्ता सांगणार नाही. अंमलबजावणी झाल्यावर तुम्हाला सर्वकाही दिसेलच. तुम्ही बिहारमधील बेरोजगारी व स्थलांदर या दोन गोष्टी एकदा जोडून पाहा. प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देता येणार नाही. या मुद्द्यावर आम्ही काम करणार आहोत.”
