पुणे : मुंबईनंतर पुण्यातील फळबाजारात मालावी आंब्यांची आवक सुरू झाली आहे. आफ्रिका खंडातील मालावी देशात यंदा आंब्यांची लागवड चांगली झाली आहे. घाऊक बाजारात मालावी आंब्यांच्या एका पेटीला प्रतवारीनुसार दोन हजार ते २७०० रुपये दर मिळाले आहेत. एका पेटीत मालावी आंब्यांची १२ ते १६ फळे असतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मालावी हापूसची आवक दहा ते पंधरा दिवस आधी झाली आहे, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील परशरमा लक्ष्मण खैरे पेढीचे संदीप खैरे यांनी सांगितले.

मालावीतील एका उद्योजकाने २०१२ मध्ये कोकणातील दापोली येथून हापूस आंब्याची मातृवृक्षे मालावी येथे नेली होती. मालावीत सातशे हेक्टरवर हापूसच्या कलमांची लागवड करण्यात आली. पोषक वातावरणामुळे आंब्यांची लागवड चांगली झाली. २०१६ मध्ये मालावीत आंबा लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला. २०१६ मध्ये आंबा लागवड झाल्यानंतर पुणे, मुंबईतील बाजारपेठेत मालावी आंब्यांची आवक सुरू झाली. करोना संसर्ग काळात मालावी आंब्यांची आवक झाली नव्हती. पंधरा दिवसांपूर्वी मुंबईतील बाजारात मालावी आंब्यांची आवक झाली.

हेही वाचा : राज्यावर जलसंकटाचे सावट; धरणांमध्ये ६६.३१ टक्केच साठा, गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के घट 

मालावी आंब्यांची आयात भारतासह दुबई आणि युरोपमधील बाजारात केली जाते. केंद्र शासनाने परदेशी आंब्यांच्या आयातीस बंदी घातली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत देशात कुठेच आंबा लागवड होत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने मालावी आयातीच्या आयातीस परवानगी दिली आहे, असे खैरे यांनी सांगितले.

हेही वाचा : पुण्यातील प्रसिद्ध ‘पूना गेस्ट हाऊस’ आता चक्क टपाल पाकिटावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मालावी आंब्यांची आवक नोव्हेंबर महिन्यात सुरू होते. नाताळ सणापर्यंत आंब्यांची आवक सुरू असते. मालावी आंबा विमानाने पाठविण्यात येतो. मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज साधारणपणे ३०० ते ४०० पेट्यांची आवक होत आहे. अहमदाबाद, सांगली, कोल्हापूर येथील फळबाजारात मालावी आंबा विक्रीस पाठविला जातो. मालावी आंब्यांची चव रत्नागिरी हापूसप्रमाणे आहे.” – संदीप खैरे, मालावी आंबा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड