Dance video: मित्राचे लग्न हे फक्त तरुणांसाठी एक कार्यक्रम नसून एक भावनिक क्षण असतो. आयुष्यात कितीही काम असले, कितीही अडचणी आल्या तरी बहुतेक मुले “त्यांच्या मित्राच्या लग्नाला जाण्याचा” आग्रह धरतात. कधी जुगार खेळून, कधी जोखीम पत्करून, तर कधी परिस्थितीवर मात करून ते त्यांच्या लग्नापर्यंत पोहोचतात. या मनापासूनच्या मैत्रीचे दर्शन घडवणारा एक अद्भुत व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक एकच म्हणत आहेत, “हीच खरी मैत्री आहे!”

व्हायरल झालेला व्हिडीओ एखाद्या साखरपुड्याचा किंवा लग्नाच्या संगीत महोत्सवाचा दिसतोय. एका मोठ्या स्टेजवर एक गाणे वाजत आहे, लोक त्याच्याभोवती नाचत आहेत आणि स्टेजच्या मध्यभागी एक तरुण हातकड्या घालून गोंधळ घालताना दिसतोय. त्याच्या हातातील हातकडीची चेन दोन पोलिस कर्मचारी धरून त्याच्या मागे उभे आहेत, पण याचं काहीही दडपण त्या तरुणावर नाही. उलट तो इतक्या मस्तीने नाचतो की इतरांनाही उत्साह येतो.

व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतं की, त्या तरुणाला आधीच अटक करण्यात आली आहे. हातात हातकडी, मागे पोलिस आणि समोर संगीताचा कार्यक्रम हे तिन्ही चित्र एकत्र पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल. पण, हा तरुण त्याच्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत आहे आणि त्याच्या उत्साही मूडमध्ये आहे. पोलिसही घटनास्थळी शांतपणे त्याची साखळी धरून आहेत. त्यांचा चेहरा बघूनही जाणवतं की त्यांनाही या तरुणाची धम्माल बघून हसू आवरत नाहीये.

पाहा व्हिडिओ

त्याच्या नाचण्यातील उत्साह, चेहऱ्यावरचे आनंदाचे भाव आणि मित्राच्या आनंदात सहभागी होण्याचा उतावळेपणा हे पाहून अनेक जण म्हणतायत की हा तरुण मनापासून खूश दिसतोय. त्याच्या डान्समधून जाणवतं की त्याच्यासाठी मित्राचं लग्न म्हणजे आयुष्यातला महत्त्वाचा क्षण आहे, मग हातकडी असो वा नसो, तो नाचणारच!

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ rjarslan_radiocity या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “या व्हिडीओवर प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. लोकांनी या तरुणाच्या दोस्तीवर प्रतिक्रिया देताना भरपूर विनोद केले आहेत. एका युजरने लिहिलं “जेल तर येत-जात राहील, पण मित्राचं लग्न मिस व्हायला नको; पाजी, सलाम!”

दुसऱ्याने म्हटलं “परिस्थिती कितीही वाईट असो, हसणं आणि आनंद साजरा करणं कधी सोडू नये, हे याच्याकडून शिकावं.” तर तिसऱ्या एका युजरने लिहिलं, “भाई, तुम्ही तर अगदी मौजच केली!” काही युजर्सनी तरुणाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून असंही म्हटलं की, तो खरंच मनापासून खूश दिसतोय, “हातकडी असूनही एवढा आनंद? बंदा दिल से खूश लग रहा है!”