गुरूवारी सकाळी दिल्लीत पावसाने धुमाकूळ घातला आणि कालकाजी रस्त्याच्या मध्यभागी एक मोठे झाड उन्मळून पडून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर पडले, ज्यामुळे एका ५० वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला तर त्याची मुलगी रुग्णालयात जीवनमरणाशी झुंज देत आहे, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे ज्यामध्ये पदपथापासून काही इंच अंतरावर असलेले हे मोठे झाड रस्त्यावरून उन्मळून पडून रस्त्यावरील वाहनचालकांच्या अंगावर पडताना दिसत आहे.
दिल्ली आणि एनसीआरच्या काही भागात मुसळधार पावसाने गुरूवारी सकाळी हजेरी लावली त्यामुळे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) गुरूवारी रेड अलर्ट जारी केला आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, पहाटे २ वाजताच्या सुमारास पाऊस सुरू झाला आणि सकाळपर्यंत सुरू राहिला. ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाच्या आधी दिल्ली सरकारने राऊस अव्हेन्यू ते कॅनॉट प्लेस पर्यंत आयोजित केलेला वॉकेथॉन मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला. दिल्लीत, सुब्रतो पार्कमधील आउटर रिंग रोडवर पाणी साचले होते, ज्यामुळे वाहनांची हालचाल मंदावली. अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, मुसळाधार पावसामुळे कालकाजी रस्त्यावर झाड कोसळ्याची घटना घडली.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कालकाजी रस्त्यावर वाहनांची ये-जा सुरू असताना अचानक काही वाहनांवर झाड कोसळले काही समजण्याआधीच सर्वकाही घडले. एका दुचाकीवर झाड कोसळले. दुचाकीवर पुरूष आणि त्याची मुलगी प्रवास करत होते. दरम्यान झाड कोसळल्यानंतर डोळ्यादेखत वडीलांचा मृत्यू झाला आणि मुलगी देखील झाडाखाली अडकली होती. जीव वाचवण्यासाठी ती धडपडत असल्याचे एका व्हिडीओमध्ये दिसत आहे. छत्री घेऊन अनेक लोक तिला आणि तिच्या वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर वडिलांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिस उपायुक्त (आग्नेय) हेमंत तिवारी यांनी सांगितले की, सकाळी ९.५० वाजता पारस चौक, कालकाजीजवळ एचडीएफसी बँकेसमोर अचानक रस्त्याच्याकडेला असलेले एक जुने कडुलिंबाचे झाड कोसळले.
येथे पाहा व्हिडीओ
https://twitter.com/PTI_News/status/1955911363940749547
परिणामी, मोटारसायकलवरून प्रवास करणारे दोन जण, सुधीर कुमार (५०) आणि त्यांची मुलगी प्रिया (२२) असे तुघलकाबाद येथील रहिवासी, पडलेल्या झाडाखाली अडकले, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर जुन्या दिल्लीतील डीयूएसआयबी नाईट शेल्टरमध्ये केअरटेकर होते.
स्थानिक पोलिसांनी पीसीआर कॉलला तातडीने प्रतिसाद दिला आणि तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले. अधिकाऱ्याने सांगितले की, प्राधान्याने जेसीबी मशीनची व्यवस्था करण्यात आली आणि पोलिस पथकाच्या सामूहिक आणि वेळेवर प्रयत्नांमुळे दोन्ही जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि वैद्यकीय मदतीसाठी सीएटीएस रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्यात आले, असे डीसीपी यांनी deccanchronicle माहिती देताना सांगितले.
मुलीवर सफदरजंग ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत, असे डीसीपी यांनी सांगितले. पुढील अडथळा टाळण्यासाठी परिसर सुरक्षित करण्यात आला होता आणि त्यानुसार वाहतूक नियंत्रित करण्यात आली होती. झाड काढून रस्ता मोकळा करण्यासाठी हायड्रॉलिक क्रेन तैनात करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. पुढील घटना टाळण्यासाठी नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि आवश्यक छाटणी करण्यासाठी महानगरपालिका अधिकार्यांना सतर्क करण्यात आले आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.