सोसायट्यांमध्ये गाडी पार्किंगवरून अनेकदा वादविवाद होताना पाहायला मिळतात. काही वेळा हे वाद इतके टोकाला जातात की, त्याचे रूपांतर नंतर हाणामारीत होते. अशा घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. अशाच एका घटनेसंदर्भातील पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सोसायटीमधील एक व्यक्ती चुकीच्या ठिकाणी पार्किंग करते. त्यामुळे शेजारचे त्याच्या गाडीवर अशी काही नोटीस चिकटवून जातात; जी वाचून युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

ट्विटरवर एका युजरने एक पोस्ट शेअर केली आहे; ज्यात त्याने शेजाऱ्यांकडून गाडी योग्य ठिकाणी पार्क करण्याची विनंती करणारी नोटीस मिळाल्याचे सांगितले आहे. सुभाशिस दास असे युजरचे नाव आहे. सुभाशिस दास यांनी सोसायटीमध्ये आपली गाडी शेजाऱ्यांच्या गाडी पार्किंगच्या जागेवर पार्क केली होती; पण शेजाऱ्यांनी त्यांच्यासोबत वाद न घालता, त्यांच्या गाडीवर एक विनंती करणारी नोटीस चिकटवली. हीच नोटीस सुभाशिस दास यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये लिहिलेय, ‘कृपया तुमची कार येथे पार्क करू नका. आम्ही तुम्हाला असे करू नका, अशी विनंती आधीच केली होती. कृपया समजून घ्या की, आम्ही सन २००० पासून या भागात राहत आहोत आणि आमच्याकडे दोन कार आहेत. त्यामुळे आम्हाला पार्किंगसाठी आणखी जागा हवी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पूर्वीच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करा. आपण चांगले आणि सहयोगी शेजारी बनू या.’ या नोटीसवर शेजाऱ्याने आपला शेजारी म्हणत स्वाक्षरीही केली होती. दासने सांगितले की, त्यांना ही नोटीस बंगळुरूच्या कोरमंगला परिसरात मिळाली आहे.

नोटीसमधील विनंतीपूर्वक भाषा पाहून दासदेखील खूप आश्चर्यचकित झाले. त्यामुळे त्यांनी आणखी एक ट्विट करत लिहिलेय, ‘मला वाटत नाही की, कोणीही त्यांची समस्या इतक्या विनम्रपणे इतर कुठेही व्यक्त केली असेल किंवा अशी विनंती केली असेल. कारण- अशा गोष्टींचा शेवट सहसा भांडणातून होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावर एका युजरने कमेंट केलीय, ‘बंगळुरूचे लोक प्रेमळ आहेत.’ तर दुसर्‍या एका युजरने म्हटलेय, ‘चांगले शेजारी बना’. याशिवाय तिसऱ्या एक युजरने म्हटलेय, ‘जर हे गुडगावमध्ये घडले असते, तर शेजाऱ्याने बेसबॉलच्या बॅटने विंडशिल्ड आधीच फोडली असती’. या पोस्टवर युजर्स आता वेगवेगळ्या कमेंटस करत आहेत.