Mumbai Local Train Fight Video: मुंबई लोकल म्हणजे फक्त प्रवासाचं साधन नाही, तर रोजचा संघर्ष आहे. दररोज लाखो मुंबईकर गर्दीच्या लाटांशी झुंज देत लोकलमधून प्रवास करतात. पण, या संघर्षात काही प्रसंग असे घडतात, जे केवळ धक्कादायकच नाही, तर अस्वस्थ करणारेही ठरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, जो दिव्यांग डब्यातील असंवेदनशील वर्तनाचं जिवंत उदाहरण आहे.
मुंबई लोकलमध्ये रोजच काहीतरी वेगळं घडतं. दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव डब्यात अचानक सुरू झालं असं काही, जे पाहून हजारो नेटकऱ्यांच्या अंगावर काटा आला. एका सीटसाठी उद्भवलेला वाद एवढा ताणला गेला की थेट मारहाण करण्याच्या धमकीवर येऊन पोहोचला. ‘उठ नाहीतर मिळून बदडू’ म्हणणारा प्रवासी आणि समोर गोंधळलेला दुसरा हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही तासांतच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. पण, या वादात खरी चूक कुणाची होती? दिव्यांग डब्यात कोणाला अधिकार? एक व्हिडीओ, दोन बाजू आणि हजारो प्रतिक्रिया… वाचा सविस्तर सगळं या व्हायरल प्रकरणामागचं सत्य…
एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला उघडपणे धमकी देत म्हटलं, “या सीटवरून उठ, नाहीतर आम्ही सगळे मिळून तुला बदडून काढू!” हे वाक्य ऐकून क्षणभर विश्वासच बसत नाही की हा प्रसंग दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव डब्यात घडला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की, सीटवर बसलेल्या व्यक्तीला उठवण्यासाठी दुसरा प्रवासी केवळ चिडचिड करत नाही, तर थेट मारहाण करण्याची धमकी देतो.
या घटनेचा व्हिडीओ hashtag_mumbainews या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे आणि तो आतापर्यंत ११ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना अक्षरशः उधाण आलं आहे. काहींनी दिव्यांग डब्यात अनधिकृतपणे चढणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली, तर काहींनी धमकी देणाऱ्याच्या अशा वागणुकीवर आक्रोश व्यक्त केला.
विशेष म्हणजे, धमकी देणारा प्रवासी त्या व्यक्तीकडे दिव्यांग असल्याचा पुरावा मागतो आणि तो नसल्यानं ती व्यक्ती जागा सोडते. पण, प्रश्न इथेच संपत नाही – लोक विचारत आहेत की, “धमकी देणाऱ्याजवळ तरी दिव्यांग कार्ड आहे का?”
या घटनेमुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे, दिव्यांगांसाठी राखीव डबे सुरक्षित आहेत का? आणि या डब्यांचं नियंत्रण कोण करतंय?
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ केवळ लोकल प्रवाशांच्या वेदनांचा आरसा नाही, तर मुंबई लोकलमधील शिस्त आणि मानवी संवेदनशीलतेच्या ढासळलेल्या पातळीचं भयावह दर्शन आहे. आता तरी संबंधित यंत्रणांनी या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं, अन्यथा दिव्यांगांसाठी राखीव असलेले डबेही ‘दादागिरीचा अड्डा’ बनतील.