देशभरात लॉकडाउनमुळे रोजगार बंद झाल्याने अनेक मजुरांचे हाल झालेत. घरी परतण्यासाठी मजुरांची हजारो किलोमीटर पायपीट सुरू आहे. पायी चालताना अनेकांना त्रासाचा सामना करावा लागतोय. काळीज पिळवटून टाकणारे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मजुरांची व्यथा मांडणारा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

या व्हिडिओमध्ये पायी चालून थकलेला एक चिमुकला सुटकेसवर झोपलेला दिसतोय. तर, त्याची आई दोरीच्या सहाय्याने सुटकेस खेचत असल्याचं दिसतंय. आपल्या चिमुकल्याला सुटकेसवर झोपवून दोरीच्या सहाय्याने ती सुटकेस खेचत जाणाऱ्या एका आईचा हा ह्रदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

व्हायरल व्हिडिओनुसार पंजाबहून उत्तर प्रदेशच्या झांसी येथे आपल्या गावाकडे जाण्यासाठी म्हणजे तब्बल 800 किमीहून जास्त पायपीट हे मजुर करतायेत. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मन हेलावणारे हे चित्र पाहून नेटकरीही सुन्न झालेत.


याशिवाय, गर्भवती पत्नी आणि लहानग्या मुलीला एका लाकडी गाडीवर बसवून ती गाडी दोरीने ओढत नेणाऱ्या एका बापाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय.


रामू असे त्या मजुराचे नाव असून दोन वर्षांच्या मुलीला आणि गर्भवती पत्नीला एका लाकडाच्या गाडीवर बसवून ती ओढत हैदराबादहून 17 दिवसांचा प्रवास करत रामू आणि त्याचं कुटुंब मंगळवारी मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये पोहचलंय.