भारतामध्ये रस्ते आणि त्यामध्ये असलेले खड्डे यांमुळे प्रत्येक नागरिक अत्यंत त्रासलेला आणि चिडलेला असतो हे आपल्याला माहीतच आहे. त्याच खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात होतात; तर काहींचा दुर्दैवी मृत्यूदेखील होतो. मात्र, असे असताना हरियाणामध्ये या खड्ड्यांमुळे चक्क एका व्यक्तीला जीवदान मिळाले असल्याचे ‘इंडिया टाइम्स डॉट कॉम’च्या एका वृत्तावरून समजते. हरियाणामधील ८० वर्षांच्या आजोबांना हॉस्पिटलमध्ये असताना मृत घोषित केले होते. त्यानंतर आजोबांचे शव त्यांच्या घरी घेऊन जात असताना एक चमत्कारिक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. नेमके हे सर्व प्रकरण काय आहे ते पाहू.

‘इंडिया टाइम्स डॉट कॉम’च्या माहितीनुसार, मृत घोषित केलेल्या व्यक्तीचे नाव हे ‘दर्शन सिंग ब्रार’ असल्याचे समजते. त्यांचे शव पतियाळामधून त्यांच्या कर्नाल येथील घरी रुग्णवाहिकेमधून नेण्यात येत होते. मृत व्यक्तीच्या घरी सर्व आप्तेष्ट मंडळी आली असून, अंतिम क्रियेची संपूर्ण तयारी केली गेली होती. दरम्यान, रुग्णवाहिकेचे चाक रस्त्यावरील एका खड्ड्यात जोरात आदळले आणि जणू चमत्कार झाला.

हेही वाचा : शाळेसाठी दिलेली बाटली पाहून नेटकरी हैराण; Video पाहून म्हणाले म्हणाले “आता शाळेत याला…”

रुग्णवाहिकेमध्ये त्या वृद्ध व्यक्तीचा नातू उपस्थित होता. वाहनाला खड्ड्यामुळे हादरा बसला. त्यानंतर त्या व्यक्तीच्या नातवाला, दर्शन ब्रारच्या [वृद्ध व्यक्ती] हाताची हालचाल जाणवली. तसेच हाताला हृदयाचे ठोके जाणवले म्हणून नातवाने रुग्णवाहिकेच्या चालकाला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी दर्शन ब्रार हे जिवंत असल्याचे सांगितले.

रुग्णवाहिका धांड गावातून जात असताना रुग्णवाहिकेला खड्डा लागला. वृद्ध व्यक्तीच्या हाताची हालचाल आणि हृदयाचे ठोके जाणवल्यामुळे जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेव्हा ती व्यक्ती जिवंत आहे, असे सांगून कर्नालमधील एन. पी. रावळ हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला.

“हा खरंच एक दैवी चमत्कार म्हणावा लागेल. घरी सर्व कुटुंबीय शोक करण्यासाठी जमा झाले होते; मात्र आता सगळे आनंद साजरा करीत आहेत. देवाची कृपा अशीच आजोबांवर राहू दे आणि ते लवकरात लवकर बरे होऊ दे, अशी प्रार्थना आहे,” असे दर्शन ब्रार यांच्या नातवाने सांगितले असल्याचे वृत्तातून समजते.

हेही वाचा : ‘अरे हा January महिना संपता संपत नाहीये’… तुम्हालाही असे वाटते आहे का? जाणून घ्या काय असू शकते कारण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या दर्शन सिंग ब्रार या ८० वर्षांच्या व्यक्तीवर कर्नाल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, त्यांची परिस्थिती गंभीर आहे, असे तेथील डॉक्टरांचे मत आहे. मात्र, ते लवकरात लवकर बरे होतील, अशी कुटुंबीयांची आशा आहे, अशी माहिती ‘इंडिया टाइम्स डॉट कॉम’च्या लेखावरून समजते.