“लवकर उठे त्यास आरोग्य धन संपत्ती मिळे” असे वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात. सकाळी लवकर उठल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात पण आजकालची तरुण पिढी रात्री जागते अन् सकाळी झोपते. ऑफिस अन् कॉलेज लवकर असेल तर सुट्टीच्या दिवशी हमखास उशीरा उठतात पण हे वागणे आई-वडीलांना कधीही पटत नाही त्यामुळे ते नेहमीच सकाळी लवकर उठण्याचा अट्टाहास करतात. “उठ ग, उशीर झाला!” असं ओरडून मुलांना उठवणं हे प्रत्येक भारतीय आईचं रोजचं काम. पण एका आईनं आपल्या मुलींना उठवण्यासाठी असा हटके प्रयोग केला की, पाहणारे हसून लोटपोट झाले. तिनं थेट बँडवाल्यांनाच घरात बोलावले आणि ढोल-ताशांच्या गजरात मुलींना उठवलं!
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं की, आई दोन बँडवाल्यांना आपल्या घरात घेऊन येते. एक जण ढोल वाजवतो तर दुसरा तुरई. दोघे थेट मुलींच्या बेडरूममध्ये जातात आणि ‘श्रीराम जानकी बैठे हैं’ हे भक्तिगीत मोठ्याने वाजवायला सुरुवात करतात. अचानक या आवाजाने झोपलेल्या दोन मुली दचकून उठतात. त्या अर्धवट झोपेतून चादरीखालून डोकावतात आणि पुन्हा चेहरा झाकून घेतात अन् झोपतात.
हा मजेशीर व्हिडिओ @jist.news या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे – यंदाची सर्वोत्तम आई..नि:संशयपणे. एका आईनं आपल्या झोपलेल्या मुलींना उठवण्यासाठी पूर्ण बँड बोलावला.”
नेटिझन्सनाही हा भन्नाट प्रयोग खूप आवडला आहे. “कृपा करून माझ्या आईच्या फीडमध्ये हा व्हिडिओ जाऊ देऊ नका,” असं एका यूजरने लिहिलं. “ घराला घर म्हणण्याचंही एक कारण आहे. नशीब मी अशा घरात नाही जन्मलो. असं दुसऱ्यानं म्हटलं. तर आणखी एका यूजरनं गंमतीत लिहिलं, “हे तर रामायणमधल्या कुंभकर्णाला उठवण्याच्या सीनसारखंच आहे!”
इतरांनी मात्र आपापल्या आईंचे किस्से शेअर केले. “आमच्याकडे तर आई फॅन बंद करते, मिक्सर सुरू करते आणि साफसफाईच्या नावाखाली चादर खेचते — म्हणजे उठल्याशिवाय पर्यायच नसतो!” असं एका यूजरचं म्हणणं आहे.
