भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून विध्वंसाच्या घटना समोर येत आहेत. सध्या राजधानी दिल्लीतील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, पुरामुळे लोकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय. दिल्लीतील बहुतांश भाग पाण्याखाली गेला असून लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. विशेषत: डोंगराळ भागात परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरात लोकांची घरं वाहून गेली आहेत. या संबंधीचे अनेक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही धडकी भरेल.
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावरून वाहत्या पुराच्या पाण्यात कार चालवताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा एक डोंगराळ भाग आहे, जिथे एक छोटीशी चूकही जीवावर बेतू शकते. तरीही ही व्यक्ती नसते धाडस करून भयंकर पुराच्या पाण्याच्या थेट उलट्या दिशेने गाडी नेत होता. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डोंगर भागातील रस्त्यांना पावसामुळे कसे भीषण स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यावरील या पुराच्या पाण्यात एक व्यक्ती खतरों के खिलाडीसारखा कार चक्क उलट्या दिशेने चालवत आहे. वाहत्या पाण्याची पर्वा न करता तो वाहन सुसाट नेत आहे. थोडीशीही चूक झाली तर ते जीवावर बेतू शकते याची त्याला अजिबात भीती वाटत नाही. पण, त्या व्यक्तीच्या धाडसाचे कौतुक करावे लागेल; कारण त्याने धोकादायक रस्त्यावर गाडी चालवली आणि न थांबता गाडी सुसाट पुढे नेत राहिला. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा धक्कादायक व्हिडीओ @HasnaZarooriHai नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आयुष्यात आत्मविश्वासाची ही पातळी आवश्यक आहे.’ या व्हिडीओला आतापर्यंत शेकडो लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही जण ‘ड्रायव्हर आणि गाडी दोघांनाही मानले पाहिजे’ असे म्हणत आहेत, तर काही जण ‘टॅलेंट या लेव्हलचा असायला हवा’ असे म्हणत आहेत; तर एका युजरने याला ‘मिशन इम्पॉसिबल’ म्हटले आहे.