Woman Brutally Thrashes Son Video : एक आई आपल्या मुलावर नि:स्वार्थी प्रेम करते. असं म्हणतात की ती मुलाला संकटात पाहून स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्याच्यासाठी काहीही करू शकते. लेकरांसाठी ती काबाडकष्ट करते. पण, तीच आई मुलाच्या जीवावर उठली तर काय? अशाच एका क्रूर आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक आई पोटच्या मुलाला लाथा-बुक्क्यांनी तुडवत बेदम मारहाण करताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. महिला मुलाला बेदम मारहाण करत जमिनीवर आपटतेय.
माता न तू वैरिणी!
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत एक महिला तिच्या लहान मुलाचे केस पकडून सटासट कानाखाली वाजवते. यानंतर अक्षरश: लाथांनी तुडवते, एकामागोमाग एक मुक्क्यांचा वर्षाव करते. ते मूल तसंच वेदनांनी विव्हळत रडत जमिनीवर पडून राहते. यानंतरही मन भरत नाही, तर काही सेकंदाने ती पुन्हा लाथांनी तुडवत त्याला पुढे पुढे घेऊन जाते. यावेळी शेजारच्याने हा भयानक मारहाणीचा प्रकार गुपचूप रेकॉर्ड केला अन् तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल.
दरम्यान, हा व्हिडीओ तेलंगणातील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओची जिल्हा बाल कल्याण अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत महिलेला ताब्यात घेत मुलाची सुटका केली आहे. मारहाण करणाऱ्या क्रूर आईचे नाव एस रामा असे आहे. ती पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या आपल्या मुलाला मारहाण करत होती.
पोटच्या मुलाला अक्षरश: लाथा-बुक्क्यांनी तुडवले
याबाबत जिल्हा बाल कल्याण अधिकारी बोनागिरी नरेश यांनी सांगितले की, रमा मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहे आणि तिचे समुपदेशन सुरू आहे. पहिल्या नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर तिने दुबईमध्ये नोकरी करणाऱ्या अंजनेयुलु नावाच्या पुरुषाशी दुसरं लग्न केले. तिच्या वागण्यामागे कौटुंबिक कलहदेखील एक कारण आहे. दरम्यान, तिची मानसिक स्थिती लक्षात घेत पुढील देखभालीसाठी मुलाला त्याच्या आजी-आजोबांकडे सोपवण्यात आले आहे.