आईची आपल्या मुलाबद्दल असलेली ओढ जगातील इतर कोणत्याही नात्यात दिसत नाही. आई आपल्या मुलासाठी कोणतेही मोठे संकट, दु:ख सहन करू शकते. संकटात ती आपल्या मुलांच्या मागे खंबीरपणे उभी असते. स्वत:च्या जीवाचे बरे-वाईट झाले तरी चालेल ती आपल्या मुलाला कधीही एकटे सोडत नाही. अनेकदा आईने मुलांसाठी केलेला त्याग पाहून आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. सध्या सोशल मीडियावर आईचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून युजर्स भावूक होत आहेत. एक आई स्वत:पेक्षा आपल्या मुलाची सर्वांत जास्त काळजी घेते याचा पुरावा म्हणजे हा व्हिडीओ आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीची वेळ आणि पाऊस पडत आहे. लोक ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. त्यात एक आई आणि मुलगा बाईकवर बसलेले दिसत आहेत आणि तेही ट्रॅफिक सुटण्याची वाट बघत आहेत. त्यादरम्यान ती आई स्वत: पावसात भिजतेय; पण आपला मुलगा भिजू नये म्हणून ती स्वत:च्या हातातील पिशवी त्याच्या डोक्यावर धरते. अशाच छोट्या छोट्या प्रसंगांतून आईची आपल्या मुलावर किती माया असते हे स्पष्ट होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी मने जिंकत आहे.

हा व्हिडीओ @SuhanRaza4 नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आई प्रत्येकाची जागा घेऊ शकते; परंतु आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी भावनिक कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, आईशिवाय सर्वोच्च दुसरे कोणी नाही. तर आणखी एका युजरने लिहिले की, आई तिच्या मुलांसाठी काहीही करू शकते. या व्हिडीओबद्दल तुमचे काय मत आहे? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.