Mumbai AC Local Train Viral Video : एसी लोकल ट्रेनमधील गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. उन्हाळा सुरू असल्याने लोक एसी लोकलने प्रवास करणे सुखकर मानत आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळांमध्ये इतर ट्रेन्सप्रमाणे एसी लोकलमध्येही तितक्याच गर्दीचा सामना करावा लागतोय. अनेक प्रवासी तिकीट जास्त असूनही एसी लोकलला प्राधान्य देताना दिसतायत; पण सध्या सोशल मीडियावर एसी लोकल ट्रेनमधील असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की, एसी लोकलसाठी एवढी महागडी तिकीट काढून फायदा काय?

कारण- या एसी लोकलमध्येही तशीच परिस्थिती निर्माण झालीय की, प्रवाशांना ऐन गर्दीच्या वेळी चक्क एसी लोकल ट्रेनच्या दरवाजावर लटकून प्रवास करण्याची वेळ आलीय. तुम्ही पाहिलंच असेल की, एसी लोकल ट्रेनचे दरवाजे पूर्णपणे बंद असतात. पण, हा व्हिडीओ अशा एका एसी लोकलचा आहे, ज्यामधील संपूर्ण वीज कनेक्शन बंद झाल्याने काळोख निर्माण झाला. त्यामुळे नॉन एसी लोकलप्रमाणे ही एसी लोकल धावत असल्याचे आणि प्रवासी उकाड्याने हैराण झाल्याने ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करीत असल्याचे दिसतेय.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, प्रवाशांनी गच्च भरलेली एक एसी लोकल प्लॅटफॉर्मवरून धावतेय. पण, लोकलमधील पंखे, वातानुकूल यंत्रणेसह सर्व दिवेही बंद झाल्याने सर्वत्र काळोख निर्माण झाला. प्रवासी आपल्या मोबाईलच्या टॉर्च ऑन करून बसले आहेत. तर, अनेक प्रवासी लोकलच्या दरवाजावर लटकून प्रवास करीत होते. एसी लोकलमधील खिडक्या उघडल्या जात नसल्याने आसनांवर बसलेले प्रवासी उकाड्याने हैराण होऊन, गुदमरल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. पण, नाईलाज म्हणून प्रवाशांना त्या परिस्थितीतही प्रवास करावा लागला. ही घटना २४ मे २०२५ रोजी दादर-विरार एसी लोकल ट्रेनमध्ये रात्री ९.२९ च्या दरम्यान घडल्याचा दावा व्हिडीओमधून करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by MiraBhayanderKar™ (@mirabhayanderkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@mirabhayanderkar नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, असाच एक प्रकार काही महिन्यांपूर्वी घडला होता, त्यावेळी प्रवाशांना चर्चगेट ते भाईंदरदरम्यान एसी लोकलचे दरवाजे उघडे ठेवून प्रवास करावा लागला. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, एवढे १०० रुपये तिकिटाला मोजून जर ही परिस्थिती असेल, तर मग ३० रुपयांचं नॉर्मल ट्रेनचं तिकीट काढून येण्यात काय वाईट आहे?