Borivali National Park Robbery Video Viral : पावसाळ्यात मुंबईतील बोरिवलीस्थित संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या उद्यानातील सिंह सफारी, व्याघ्र सफारी आणि पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या धबधब्यात भिजण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसतात. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी गेटवर मोठा पोलीस बंदोबस्त असतो; पण उद्यानात गेल्यानंतर पर्यटकांची सुरक्षा मात्र राम भरोसे असते, असे दिसून येते. कारण- बोरिवली नॅशनल पार्कमधील चोरीच्या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात झुडपांमध्ये लपून बसेला चोर पर्यटकाच्या हातून बॅग हिसकावून पळून गेल्याचे सांगितले जात आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगल परिसरातील रस्त्यावरून अनेक पर्यटक पायी चालत, सायकल किंवा आतील शासकीय वाहनातून कान्हेरी गुंफा, गांधी टेकडी अशा ठिकाणी पोहोचतात. पण, पायी चालत जाणाऱ्या वृद्ध पर्यटकांना हेरून, चोर त्यांच्याकडील वस्तू हिसकावताना दिसतात.
व्हायरल व्हिडीओतही एका वृद्ध पर्यटक जोडप्याबरोबर असाच काहीसा प्रकार घडला. हे वृद्ध जोडपं उद्यानात चालत जात होते. यावेळी रस्त्यावर कोणीही नव्हतं. त्यामुळे झुडपात लपून बसलेल्या चोरानं संधी साधून, त्यांच्याकडील बॅग हिसकावली आणि तो पळून गेला; पण ते जोडपं काहीच करू शकलं नाही. काही वेळानं तिथे पर्यटक तरुणांचा ग्रुप आला, ज्यांना त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला.
या व्हिडीओत वृद्ध जोडपं असा आरोप करीत आहे की, चोरी करणारा चोर तेथील स्थानिक व्यक्तीच होती. ज्याला चोरी करून कुठे पळून जाऊन लपायचं हे चांगल माहीत असेल. तसेच तरुणांचा ग्रुपही त्याला समर्थन देताना दिसतोय. या घटनेमुळे आता पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, पर्यटक आता या उद्यानात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी करीत आहेत.
हा व्हिडीओ jayesharyavlogs नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे., ज्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. अनेकांनी स्थानिकांना या घटनेसाठी दोष देणं चुकीचं आहे, असं म्हटलं आहे; तर अनेकांनी पर्यटकांबरोबर घडलेली ही घटना फारच भयानक असल्याचं म्हटलं आहे.