Mumbai Kabutarkhana Controversy video: मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर पालिकेकडून त्या संदर्भात कारवाई करण्यात आली. दादरमधील कबुतरखाना मुंबई महापालिकेकडून कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून तो बंदही करण्यात आला होता. मात्र, त्या विरोधात जैन समाजाने आवाज उठवला होता. आज मुंबईच्या दादरमध्ये जैन समाज आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अशातच या कबुतरखान्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी दादरमध्ये कबुतरखान्याजवळ कबुतरांनी प्रचंड संख्येनं येत काय केलं ते तुम्हीच पाहा.
कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद आता कबुतरांसमोर कसा मांडणार? कबुतरखाना बंद झाल्यानंतरही शेकडो कबुतरे त्या चौकात आजही बसलेली दिसतात. कबुतरांचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कबुतरखाना पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्याच्यावर काळ्या रंगाचे छत टाकण्यात आले आहे. पण ही कबुतरे अनेक वर्षांपासून या ठिकाणी दाणे टिपण्यासाठी येत आहेत, त्यामुळे हे ठिकाण ती सहजासहजी सोडतील, असे वाटत नाही. ही कबुतरे अन्नाच्या शोधात आसपासच्या परिसरात फिरताना दिसत आहेत. सध्या दादरमध्ये शेकडो कबुतरांचे थवेच्या थवे उडताना दिसत आहेत. जणू कबुतरांचे थवेही या गोष्टीचा निषेध करीत आम्ही इथून हलणार नाही, असाच संकेत देत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच लोकांना आता प्रश्न पडला आहे की, मुंबई महापालिकेने कबुतरखाना बंद केला; पण ही गोष्ट कबुतरांना कोण सांगणार?
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ @IrshadMumbaikar या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आता नेटकरी आपापल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
दादरच्या कबुतरखान्याजवळ राडा, कबुतरप्रेमी आक्रमक; ताडपत्री काढली, आत घुसले आंदोलक!
मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यानंतर त्यावर जैन समाजाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला. यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकही झाली. या बैठकीत राज्य सरकार या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मात्र, यानंतरही आज मुंबईच्या दादरमध्ये जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
कबुतरखान्याजवळ मोठ्या संख्येनं आंदोलक जमा झाले व त्यांनी ताडपत्री फाडून आतमध्ये प्रवेश केला. घोषणाबाजी, पोलिसांशी हुज्जत असे प्रकार तिथे पाहायला मिळाले. मात्र, तिथे गोंधळ घालणारे बाहेरचे लोक होते, असं विधान मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे.