Mumbai Local Train Stunt : मुंबईची लाईफलाईन असं जिचं वर्णन केलं जातं ती म्हणजे लोकल ट्रेन. या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. कसारा, कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही मध्य रेल्वे, पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी हार्बर रेल्वे तर विरार ते चर्चगेट अशी पश्चिम रेल्वे लोकल मार्ग आहेत. या तिन्ही मार्गांवर प्रवाशांची गर्दी असतेच. तसंच टवाळखोरांचाही सुळसुळाट पाहण्यास मिळतो. शिवडी स्थानकातला एका टवाळखोर तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकल ट्रेन सुरु झाल्यानंतर धावत्या ट्रेनमध्ये या तरुणाने हा जीवघेणा स्टंट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आता पोलिसांकडून या टवाळखोराचा शोध सुरु करण्यात आला आहे.

हे पण वाचा- VIDEO: असा स्टंट कोण करतं? दोन वेगवान कारवर उभा राहिला अन्… ‘त्याचा’ हा स्टंट सोशल मीडियावर व्हायरल

काय आहे व्हिडीओत?

लोकल ट्रेनच्या दारात लटकून तरुण स्टंट करताना दिसतो आहे. लोकल सुरु झाली आहे. त्या धावत्या लोकलमधल्या एका डब्याच्या खांबाला पकडून हा तरुण प्लॅटफॉर्मवर पाय ठेवून वेगाने जाताना दिसतो आहे. त्याला डब्यातले लोक सांगत आहेत की असं करु नकोस तरीही तो कुणाचंही ऐकत नाही. शेवटी प्लॅटफॉर्म संपायला येतो तेव्हा घाईने तो डब्यात चढतो आहे. अशा हुल्लडबाज प्रवाशांमुळे शिस्तीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होतो. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा स्टंटबाजांना आवरा, हवेत कशाला जिवघेणे स्टंट?, असे लोक स्वतःची माती करुन घेतात अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी या व्हायरल व्हिडीओवर दिल्या आहेत.

Viral Video of Stunt
स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलीस या तरुणाचा आता शोध घेत आहेत.

शिवडी स्थानकातला आहे हा व्हिडीओ

स्टंट करणारा तरुण कोण? हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र शिवडी स्थानकावरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस आता हुल्लडबाज तरुणाचा शोध घेत आहेत. तसंच हा हुल्लडबाज तरुण कुणाला दिसला तर पोलिसांना कळवा असं आवाहनही मध्य रेल्वेतर्फे करण्यात आलं आहे. अशा प्रकराच्या स्टंटबाज तरुणांमुळे इतर प्रवाशांच्या जिवालाही धोका निर्माण होतो अशी कुठलीही स्टंटबाजी तुमच्या जिवावर बेतू शकते त्यामुळे ती करु नका असं आवाहनही मध्य रेल्वेने केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा शोध सुरु

लोकलच्या अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या संख्येत गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. यापैकी अनेकांचा स्वतःच्याच चुकीमुळे जीव गमवावा लागत असल्याचंही समोर आलं आहे. काही सेकंदांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरपीएफने त्याची चौकशी सुरु केली आहे. हा व्हिडोओ नेमका कधीचा आहे याचा तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही. परंतु चुकूनही अशी स्टंटबाजी करु नका, असे आवाहन करण्यात आले आहे.