Mumbai Local train Robbery Video : मुंबई लोकल ट्रेनने रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पण, या प्रवासादरम्यान खूप काळजी घ्यावी लागते; अन्यथा मोबाईल, दागिने किंवा मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता असते. कारण- चोर गर्दीचा फायदा घेऊन, प्रवाशांच्या महागड्या वस्तू पळवताना दिसतात. पण, सध्या मुंबई लोकलमध्ये अशीच एक चोरीची घटना घडली आहे, जी तुम्ही यापूर्वी कधी पाहिली नसेल. कारण- यात चोराने भर प्रवाशांसमोरच रेल्वेच्या सामानाची चोरी केली. विशेष म्हणजे धावत्या लोकलमधून ही चोरी करण्यात आली आहे, ज्याचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होतोय.
तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की, मुंबई लोकलमध्ये प्रवाशांच्या महागड्या वस्तूंची चोरी होते; पण व्हिडीओत एक चोर चक्क रेल्वेच्या सामानाची भरदिवसा चोरी करताना दिसतेय. त्यावरून लोकांनी रेल्वे पोलीस काय झोपा काढतात का, असा सवाल केला आहे. हा व्हिडीओ बदलापूर रेल्वेस्थानकातील असल्याचे सांगितले जातेय.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ट्रेनच्या दरवाजावर लटकून एक जण प्रवास करीत होता, जो ट्रेन सुरू होताच रुळांच्या बाजूला असलेल्या गटारावर उतरतो आणि चक्क गटारावरील एक लोखंडी जाळी उचलून ट्रेनच्या मालडब्यात भरतो. त्यानंतर लगेच तो धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो. पण त्या लोखंडी जाळीने ट्रेनचा दरवाजा पूर्ण पॅक झाल्याने त्याला चढण्यास नीट जागा मिळत नाही. तरी तो दरवाजावर तसाच लटकून प्रवास करतो. यावेळी रेल्वे पुलावर उभ्या असलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये ही घटना रेकॉर्ड केली, ज्याचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होतोय.
लोकलमधील चोरीचा हा व्हिडीओ @badlapurkar_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. एका युजरने लिहिले की, रेल्वेची संपत्ती रेल्वेतच भरून चोरी केली जातेय. दुसऱ्याने लिहिले की, रेल्वे पोलीस काय झोपा काढतायत का? तिसऱ्याने लिहिले की, आणि मग आम्ही तक्रार करणार की देशाचा विकास होत नाही. सगळे चोर भरलेत देशात. शेवटी एकाने लिहिले की, रेल्वेचे सामान चोरी करून आता हे भंगारात विकणार आहे.