Mumbai Local Automatic Door video: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात.मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. या मुंबई लोकलची गर्दी हीच तिची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र मुंब्रा लोकल अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला होता. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजा बसण्याची चर्चा सुरु होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत रेल्वेसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती दिली होती. आता प्रत्यक्षात स्वयंचलित दरवाजा असलेल्या नॉन एसी लोकल ट्रेनची चाचणी घेण्यात आली आहे.
मुंबईच्या लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी आता मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या लोकलमध्ये दररोज होणारे अपघात पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व लोकल्सना स्वयंचलित दरवाजे बसवण्याची घोषणा केली होती.या घोषणेनंतर मुंबईच्या लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याची चाचणी सूरू आहे.नुकतीच कुर्ला कारशेडमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याची चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाल्याची समजते आहे.त्यामुळे आता प्रवाशांच्या सेवेत लवकरच स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल येणार आहे.
नॉन-एसी लोकलमध्ये बसवण्यात आलेले हे स्वयंचलित दरवाजे एसी लोकल ट्रेनच्या दरवाजांसारखेच आहेत. मात्र, नॉन-एसी लोकलसाठी खास विचार करून महिलांच्या एका डब्यात बसवण्यात आलेल्या या दरवाज्याला हवा खेळती रहावी यासाठी जाळ्या आणि फ्लॅप्स बसवण्यात आले आहेत. यामुळे पाऊस झाल्यास पाणी आत येणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ
कशी असणार दरवाजांची सुविधा
हे दरवाजे बंद झाल्यावर हवा खेळती राहण्यासाठी दरवाजाच्या खालील भागात जाळी लावण्यात आली आहे. वरील बाजूस काचेचा वापर करण्यात आला आहे. दरवाजाच्या मध्यभागी झडपा असून पावसाळ्यात पाणी आत येऊ नये, या पद्धतीने त्या बसवण्यात आल्या आहेत. वातानुकूलित लोकलच्या वेळेप्रमाणे अर्थात १० सेकंदांत दरवाजे उघड – बंद होण्याची, हालचाल होताना अलार्मची व्यवस्था या विना वातानुकुलित ट्रेनच्या दरवाजासाठीही करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.