Mumbai Local Viral Video : सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनसंबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी ट्रेनच्या टॉयलेटमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे व्हिडीओ व्हायरल होतात, तर कधी सीटवरून प्रवाशांमधील राड्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. अनेकदा असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे फारच धक्कादायक असतात. सध्या मुंबई लोकल ट्रेनमधील अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही तीव्र संताप व्यक्त कराल.
हा व्हिडीओ ठाणे-पनवेल लोकल ट्रेनमधील असल्याचे सांगितले जात आहे. त्यात एक तरुण महिलांच्या बाजूच्या विकलांगांच्या डब्यातून महिलांच्या डब्यात बसलेल्या तरुणींकडे पाहून अश्लील हावभाव करीत होता. यावेळी एका तरुणीने त्याचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकाल की, एक तरुण मधल्या महिलांच्या डब्याच्या बाजूच्या विकलांगांच्या डब्यात उभा होता. यावेळी महिलांच्या डब्यातील तरुणींकडे पाहून अश्लील हावभाव करीत होता. यावेळी त्याने एका तरुणीकडे पाहून जीभ ओठांवर फिरवीत अश्लील इशारे केले. तो असे वारंवार करीत होता. त्यामुळे ती तरुणी संतापली आणि तिने गुपचूप त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला. अनेकांनी, त्या तरुणाला तिथेच चांगला धडा शिकवला पाहिजे होता, असे म्हटले आहे.
दरम्यान, तो तरुण दुसऱ्या डब्यात असल्याने ती काही करू शकली नाही. त्यामुळे तिने हा व्हिडीओ काढला; पण हे त्याला समजताच तो पुढच्या स्थानकावर उतरून पळून गेला, असे ती तरुणी म्हणाली.
तरुणाचा हा धक्कादायक व्हिडीओ @archana_gaonkar_photography नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लिहिण्यात आले की, मुलींनो सावधान! हे असे तुम्हाला नेहमी भेटतील; पण घाबरून जाऊ नका, बिनधास्त लढा आणि व्हिडीओ करा. तर कॅप्शनमध्ये लिहिले की, कितीही काही झालं तरी चूक ही बाईचीच काढा, धन्य तो समाज…
दरम्यान, अनेकांनी या व्हिडीओवर विविध कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, अशा वेळी हेल्पलाईन नंबरवर फोन का केला नाही. दुसऱ्याने लिहिले की, तिथेच तुडवायचं ना त्याला. तिसऱ्या एकाने लिहिले की, याचा व्हिडीओ एवढा शेअर करा की, त्याच्या आई-वडिलपर्यंत हा व्हिडीओ गेला पाहिजे. त्याला अद्दल घडलीच पाहिजे. अशा अशी कृती करणाऱ्यांना वेळीच ठेचले जाणे गरजेचे आहे.