‘श्यामची आई’ हे पुस्तक व ‘शाळा’ ही कादंबरी तुमच्यातील अनेकांनी वाचली असेल. श्यामची आई हे नाव ऐकलं की, आठवतात ते ‘साने गुरुजी.’ पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांनी या पुस्तकात आईविषयी प्रेम, जिव्हाळा, कृतज्ञता अशा भावना ‘श्यामची आई’ पुस्तकात मांडल्या आहेत. तसेच ‘शाळा’ ही कादंबरी ‘मिलिंद बोकील’ यांनी लिहिलेली आहे. या कादंबरीवर चित्रपटदेखील तयार करण्यात आला होता. तरुण वयातील आणीबाणी आणि प्रेमकथा यावर आधारित हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. ‘शाळा आणि श्यामची आई’ ही बोलकी पुस्तके आहेत, जी मानवी जीवनाशी संबंधित आहेत; तर आज याच संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. मुंबई पोलिसांनी ‘शाळा आणि श्यामची आई’ या पुस्तकांना अनुसरून वाहनचालकांसाठी खास संदेश दिला आहे.
आज मुंबई पोलिसांनी श्यामची आई पुस्तक आणि शाळा ही कादंबरी यांच्याशी निगडित एक खास पोस्ट शेअर केली आहे. प्रवाशांना आवाहन करत मुंबई पोलिसांनी दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये शाळा आणि श्यामची आई या पुस्तकांची नावे लिहिली आहेत आणि त्यावर खास संदेश लिहिण्यात आले आहेत.
पहिल्या फोटोमध्ये : ‘सांगे श्यामची आई, गाडी चालवताना करू नको घाई’ असे लिहिले आहे. मुंबई पोलिसांनी वेगात वाहन चालवणाऱ्या ‘त्या’ प्रत्येक वाहनचालकाला सल्ला दिला आहे.
तर दुसऱ्या फोटोमध्ये : ‘आयुष्याची शाळा सांगे वाहतुकीचे नियम पाळा’ असे लिहिले आहे; तर मुंबई पोलिसांनी सिग्नल तोडणाऱ्या, हेल्मेट न घालणाऱ्या आदी अनेक वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे. पुस्तकातून वाहतुकीचे धडे देणाऱ्या मुंबई पोलिसांची ही पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा बघाचं.
हेही वाचा…एटीएमचा वापर करताय तर सावधान! अशा प्रकारे तुमचेही बँक अकाउंट होईल रिकामे; Video पाहा आणि सतर्क व्हा
पोस्ट नक्की बघा :
पुस्तकातून दिले वाहतुकीचे धडे :
एखादा सण असो किंवा महत्वाचा कार्यक्रम; गर्दीवर नियंत्रण ठेवणे, लोकांच्या सुरक्षेची काळजी घेणे याची जबाबदारी मुंबई पोलिसांवर असते. २४ तास प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून, संकटकाळी मदतीसाठी धावून जाणं आणि वारंवार अनेकांना नियमांची आठवण करून देणं यात मुंबई पोलिस कुठेच कधीच मागे पडत नाहीत. तर आज या पोस्टमधूनसुद्धा असंच काहीसं पहायला मिळालं आहे. वाहतुकीच्या नियमांचे प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाला पुस्तकांच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी धडे दिले आहेत आणि #बोलकी पुस्तके असे लिहून वाहतुकीच्या नियमांची आठवण करून दिली जात आहे.
@mumbaipolice यांच्या अधिकारीक इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करून “पुस्तकांसह घ्या वाहतुकीचे धडे” असे खास कॅप्शन दिले आहे.मुंबई पोलिस वेळोवेळी सोशल मीडिया पोस्टमधून, मुंबईकरांना चांगल्या गोष्टींवर कौतुकाची थाप; तर त्यांच्या चुकांना लाठीचा मर देत असतात. तर आज मुंबई पोलिसांनी पुस्तकातील धडे गिरवत मुंबईकरांना वाहतुकीच्या नियमांची आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी मोलाचा सल्ला या पोस्टमधून दिला आहे; जो अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.