Mumbai Police Cyber Crime Helpline Number : काही दिवसांपासून मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसतेय. त्याविरोधात सरकार आणि सायबर पोलीस यंत्रणांकडूनही महत्वाची पावलं उचलली जात आहेत. पण दुसरीकडे अनेक जण या सायबर गुन्ह्याचे बळी ठरत आहेत. सायबर गुन्हेगार रोज नवनवीन युक्त्या वापरून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत, ज्यामुळे रोज शेकडो लोकांची वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाईट्सवरून आर्थिक फसवणूक होतेय. दरम्यान, याच घटनांना आळा घालण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी सायबर हेल्पलाईन नंबर जारी केला आहे, जो तुम्ही आताच तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला पाहिजे. कारण- या माध्यमातून तुम्ही सायबर फसवणूक होण्याआधीच ती रोखू शकता. मुंबई पोलिसांनी या संदर्भात एक्सवर एक पोस्ट केलीय.

मुंबई शहरात रोज अनेकांची सायबर फसवणूक होतेय. कॉल, मेसेज तसेच विविध ऑनलाइन वेबसाईट्सच्या माध्यमातून गुन्हेगार लोकांचे बँक अकाउंट क्षणात खाली रिकामी करतायत. यात विशेषत: वयोवृद्ध लोकांची अधिक फसवणूक होतेय. दरम्यान, विविध माध्यमांतून अशा प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहा अशा सूचना देऊनही लोक यात फसतायत. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी १९३० हा सायबर हेल्पलाईन नंबर जारी केला आहे, ज्याच्या मदतीने प्रसंगावधान राखून वेळीच तुमची सायबर फसवणूक होणे थांबवू शकता.

मुंबई पोलिसांची नेमकी पोस्ट काय?

ऑनलाईन फसवणूकीच्या संरक्षणासाठी तुमचा विश्वासू साथीदार – सायबर हेल्पलाईन १९३०!

हेल्पलाईन निर्मिती पासून एकूण १२,८५,८८१ कॉल्स प्राप्त झाले असून,बँकेतून फसवणूक झालेली ₹२९४ कोटींपेक्षा अधिक रक्कम गोठवण्यात यश आले आहे.

प्रसंगावधान राखून वेळेत १९३० डायल करा आणि सायबर फसवणूक होण्याआधीच थांबवा!

दरम्यान, तुम्हीही मुंबई पोलिसांनी दिलेला हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि सायबर फसवणुकीपासून दूर राहा.