मुंबईत मंगळवारपासून चारचाकींमधील प्रवाशांनाही सीटबेल्टची सक्ती करण्यात आली असून, मुंबई पोलिसांकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. मुंबई पोलिसांकडून सध्या चालक आणि प्रवाशांना फक्त समज दिली जात असून, ११ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार आहे. दरम्यान मुंबई पोलिसांच्या कारवाईवरुन स्टँडअप कॉमेडियन अतुल खत्री याने टोला लगावला आहे. मुंबई पोलिसांनीही त्याच्या ट्वीटरला उत्तर दिलं असून प्रवाशांची सुरक्षा मस्करीचा विषय नसल्याचं म्हटलं आहे.

विश्लेषण: सीटबेल्टबाबत नवीन कायदा काय आहे?

अतुल खत्री याने ट्वीटरला एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्याने सीटबेल्ट प्रिंट असलेला टी-शर्ट घातला आहे. ‘मुंबईकरांनो आजपासून सीटबेल्ट घाला किंवा हा टी-शर्ट खरेदी करा’ असं अतुल खत्री याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. सोबत त्याने टी-शर्टचा फोटोही शेअर केला आहे. या ट्वीटरला मुंबई पोलिसांनी उत्तर दिलं असून, आपला संदेश पोहोचवला आहे.

“चलानसोबत आम्ही हे टी-शर्टदेखील तुमच्यासाठी जमा करुन ठेवू. तुमची सुरक्षा हा मस्करीचा विषय नाही,” असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच जर हा तुमच्या स्टँडअपचा भाग असेल तर सुरक्षेचा संदेशही पोहोचेल याची काळजी घ्या असंही त्यांनी म्हटलं आहे.

सीटबेल्ट न बांधल्याप्रकरणी मुंबईत १८५ जणांवर मंगळवारी वाहतुक पोलिसांनी कारवाई केली. सीटबेल्ट प्रकरणी १० दिवस जनजागृतीवर भर देण्यात येणार असून त्यानंतर आणखी तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सीटबेल्टप्रकरणी मुंबई शहरात सर्वाधिक कारवाई वरळी वाहतुक चौकीकडून करण्यात आली. पोलिसांनी वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्याचे नियोजन केले आहे. दहा दिवस जनजागृती केल्यानतंर कारवाया आणखी तीव्र करण्यात येतील. त्याबाबत वाहतुक चौक्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मोटार वाहन (सुधारित) कायदा, २०१९ च्या कलम १९४ बी (१) अंतर्गत सीट बेल्ट न बांधल्याबद्दल कारवाई करण्याची तरतुद आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.

मुंबईत पहिल्या दिवशी सीटबेल्ट न बांधणाऱ्या १८५ जणांवर कारवाई

मुंबईत मोटार वाहन चालक व सह प्रवासी यांनी सीटबेल्ट लावणे १ नोव्हेंबरपासून बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी १४ ऑक्टोबरला आदेश जारी केले होते. पुढील वा मागील आसनावर बसलेल्या सहप्रवाश्यांनी सुरक्षा बेल्ट लावला नसेल, तर वाहतुक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्या व्यक्तींच्या मोटरवाहनात सीटबेल्टची व्यवस्था नसेल, अशा वाहन मालकांना १ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.