Rain Today Viral Video: गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यासह अनेक भागांत पावसाचा कहर पाहायला मिळतोय. काल मुंबईत हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता तर आज मुंबईसह पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून आज दिवसभर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोसळणाऱ्या या जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. या सगळ्याचा रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना गरज असली, तरच घराबाहेर पडा, अशा सूचना दिल्या जात आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात मुंबई लोकलमधून प्रवास करणारा नोकरदारवर्ग अक्षरश: रुळांवर उतरला आहे. नेमकं काय घडलंय या व्हिडीओमध्ये जाणून घेऊ या…
व्हायरल व्हिडीओ (Mumbai Local Rain Viral Video)
सध्या सर्वत्र पावसाने जोर धरला आहे. अशातच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की लोकल मध्येच थांबली असून अनेक प्रवासी लोकमधून रेल्वे रुळावर उतरले आहे. रेल्वे रुळावर अक्षरश: कमरेइतकं पाणी साचलं असून संपूर्ण रूळ पाण्याखाली गेले आहेत. याच रुळावर अनेक प्रवासी उतरले असून त्यांच्या बाजूने भरवेगात दुसरी लोकल धावताना दिसतेय. यातले काही प्रवास हात दाखवून ती लोकल थांबवण्याचा प्रयत्न करतानाही दिसतायत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @poojari77777 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला २५ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “सरकार कुठे आहे आता तर जागोजागी पाणी भरलं आहे” तर दुसऱ्याने “अशा परिस्थितीत कोणाला काही झालं तर जबाबदार कोण असेल” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “हाल हाल होतायत मुंबईच्या लोकांचे आणि कोणीही वाली नाही.”