दिल्लीसह उत्तर भारतामधील अनेक शाळांमधील पाठ्यपुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांना सुचविण्यात आलेला एक प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. हे समप्रमाण जाणून घेण्यासाठी दोन लाकडी खोके घ्या. एका खोक्याला हवा जाण्यासाठी भोक पाडा. त्यानंतर दोन्ही खोक्यांमध्ये मांजरीचे पिल्लू ठेवा. थोड्यावेळाने दोन्ही खोके उघडून पाहा. त्यावेळी हवाबंद खोक्यातील मांजरीचे पिल्लू मेले असेल. यावरून हे सिद्ध होते की, कोणताही सजीव प्राणी ऑक्सिजनअभावी काही मिनिटांपेक्षा जास्तकाळ जिवंत राहू शकत नाही, असे चौथी इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात नमूद करण्यात आले आहे. उत्तर भारतातील अनेक शाळांमध्ये पर्यावरणशास्त्र हा विषय शिकविण्यासाठी पी.पी. पब्लिकेशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेले ‘अवर ग्रीन वर्ल्ड’ हे पुस्तक वापरले जाते. काही दिवसांपूर्वी या पुस्तकात सुचविण्यात आलेला हा धक्कादायक प्रयोग काही पालकांच्या निदर्शनास आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या पुस्तकाचे बाजारपेठेतील वितरण थांबविण्यात आल्याची माहिती पी पी पब्लिकेशनच्या परवेश गुप्ता यांनी दिली.
आम्हाला काही पालकांनी महिनाभरापूर्वी फोन करून पुस्तकातील संबंधित मजकूर मुलांसाठी हानिकारक असल्याचे सांगितले. त्यामुळे हा मजकूर पुस्तकातून काढून टाकावा, अशी मागणीही या पालकांनी केली होती. त्यानंतर आम्ही बाजारपेठेतील सर्व पुस्तके परत मागवली आहेत. आता आम्ही पुढीलवर्षी पुस्तकाची सुधारित आवृत्ती बाजारपेठेत आणू, असेही गुप्ता यांनी सांगितले. दरम्यान, काही शाळांकडून हे पुस्तक याआधीच खरेदी करण्यात आल्यामुळे अजूनही विद्यार्थ्यांना यामधूनच शिकवले जात आहे. काही पालकांनी याबद्दल प्राणीमित्र संघटनांनाही कळवले आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली असून प्राणीमित्र संघटनांनी पी.पी. पब्लिकेशनविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, आम्ही पुस्तकातील आक्षेपार्ह मजकुराबद्दल प्रकाशकांशी बोललो आहोत. त्यांनी हे पुस्तक बाजारातून मागे घेण्याची तयारी दर्शविली असल्याचे प्राणीमित्र ‘एफआयएपीओ’ संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. दिल्लीत आठवी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकाशकाचे पाठ्यपुस्तक वापरण्याची परवानगी आहे. शाळांनादेखील कोणतेही पाठ्यपुस्तक वापरण्याची परवानगी असली तरी यामध्ये शैक्षणिक मंडळाने निर्धारित केलेला अभ्यासक्रमाचे निकष पाळण्याचे बंधन आहे.