मंदिर, मशिद असो वा कोणतंही प्रार्थनास्थळ अशा ठिकाणाहून चप्पला किंवा बूट चोरीला जाणे ही सामान्य बाब आहे. शिवाय अशा ठिकाणी चप्पलांची चोरी झाली की लोक जास्त शोधाशोध न करता शांतपणे आपल्या घरी निघून जातात. पण उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका तरुणाने चप्पल चोरीला गेली म्हणून चक्क पोलिसांत एफआयआर दाखल केल्याची घटना समोर आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली ही तक्रार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. याबाबतचे वृत्त आजतकने दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या दाबौली भागात राहणाऱ्या कांतीलाल निगम नावाचा तरुण एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करतो. रविवारी तो शहरातील एका प्रसिद्ध मंदिरात देव दर्शनासाठी गेला होतो. देवळात जाण्यापूर्वी त्याने पूजेचे साहित्य विकणाऱ्या दुकानाबाहेर चप्पल काढली. दरम्यान, तो मंदिरातून परत आला तेव्हा दुकानाबाहेरून त्याची चप्पल चोरीला गेली होती. कांतिलालने आधी मंदिराच्या परिसरात चप्पल शोधली, मात्र त्याला ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे अखेर त्याने कानपूर पोलिसांच्या ई-पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला.

हेही पाहा- मधाची शुद्धता तपासण्यासाठी आजोबांची अनोखी ट्रिक, थेट २०० रुपयांच्या नोटेला लावली आग, व्हायरल Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

चप्पल चोरीला गेल्याची तक्रार करणाऱ्या कांतीलाल याने सांगितलं की, मी दोन दिवसांपूर्वी नवीन चप्पल खरेदी केली होती. मी दर रविवारी मंदिरात देव दर्शनासाठी येतो. माझी चप्पल यापूर्वी कधीही चोरीला गेली नाही. मात्र आज दुकानाभोवती अनेक जुनी चप्पल पडलेली असतानाही माझी नवीन चप्पल गायब झाले. याचा अर्थ नवीन चप्पलांवर कोणीतरी नजर ठेवतं आहे, म्हणूनच मी याबाबत एफआयआर दाखल केली आहे.

हेही वाचा- ३ वर्षे १६ कुत्र्यांबरोबर फ्लॅटमध्ये राहत होती महिला; दुर्गंधी येऊ लागल्याने लोकांनी दरवाचा उघडला, आतील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला

कांतिलालने एफआयआरमध्ये लिहिले आहे, “मी कष्टाच्या पैशाने चप्पल खरेदी केली होती. ते चोरीला गेल्यानंतर मला अनवाणी घरी जावे लागले. याचा मला खूप त्रास झाला. त्यामुळे माझी चप्पल चोरणाऱ्याला पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा.” या प्रकरणावर पोलिस म्हणाले की, चोरी कोणत्याही गोष्टीची असो, छोटी गोष्ट असो वा मोठी, गुन्हा नोंदवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. एफआयआर दाखल करणाऱ्या व्यक्तीकडून चप्पल खरेदीचे बिल मागविण्यात आले असून त्यानंतर चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू.