नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. यानंतर पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. बाद झालेल्या या जुन्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये जमा करण्यात आल्या. देशभरातून एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा जमा झाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याचे काय करणार याचे कुतूहल अनेकांना होते ते अजूनही क्षमले नाही. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयकडे १४ लाख कोटींचे मूल्य असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा जमा झाल्या होत्या. या नोटा नष्ट करण्याचे मुख्य काम आरबीआयचे होते. त्यानुसार या नोटांचे बारीक तुकडे करून त्याचा लगदा करण्यात आला. यातला काही लगदा अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यू़ट ऑफ डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. या जुन्या नोटांपासून तयार करण्यात आलेल्या लगद्याचा वापर करून हे विद्यार्थी आपली कलात्मकता वापरून नवनवीन वस्तू बनवत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोटा बनवण्यासाठी वापरण्यात आलेला कागद हा टिकाऊ आणि उत्तम दर्जाचा होता. तेव्हा या लगद्यापासून तयार होणाऱ्या वस्तूही दीर्घकाळ टिकू शकतात, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. इथल्या मुलांनी या लगद्यापासून लँम्प शेड, गाद्या, आसने, टेबलटॉप यासारख्या वस्तू बनवल्यात.  काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेच्या केरळमधल्या शाखेने जुन्या नोटा हार्डबोर्ड बनवणा-या फॅक्टरीला पुनर्वापरासाठी देऊ केल्या होत्या. कुन्नरमध्ये ‘द वेस्टर्न प्लाईवुड्स लिमिटेड’ ही देशातील एकमेव हार्डबोर्ड बनवणारी कंपनी आहे. या कंपनीला बँकेत जमा झालेल्या हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा आरबीआयने दिल्या . फॅक्टरीमध्ये या जुन्या नोटांचे बारीक तुकडे करून त्याचा लगदा बनवला होता. या नोटांचा लगदा आणि लाकडाचा लगदा एकत्र करून त्यापासून हार्डबोर्ड बनवण्याचे काम या फॅक्टरीमध्ये सुरू होते. रिझर्व्ह बँक प्रत्येक वर्षाला चलन छापण्यासाठी ४० कोटी रूपये खर्च करते. त्यामुळे या नोटा जाळून किंवा पुरून टाकण्यापेक्षा त्याचा पुनर्वापर करण्याचा पर्याय आरबीआयने आता स्वीकारला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nid student made creative things from demonetization old notes
First published on: 25-04-2017 at 20:39 IST