Viral Photo: सोशल मीडियामुळे अगदी घरबसल्या आपण जगभरातील कोणताही फोटो, व्हिडीओ अगदी सहज पाहू शकतो. अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यावर अनेक मजेशीर फोटो सतत व्हायरल होताना आपण पाहतो. अनेकदा यावर प्राण्यांचेही बरेच फोटोदेखील व्हायरल होत असतात; ज्यांवर लाखो लाइक्स अन् कमेंट्सही येत असतात. दरम्यान, आता असाच एक गंभीर; पण गमतीशीर फोटो समोर आला आहे. तो पाहून अनेकांचा थरकाप उडला आहे.

सुरुवातीला हा व्हायरल फोटो एका वाघाचा असल्याचं म्हटलं जात होतं; ज्यामुळे पाँडिचेरीमधील लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. यामागचे कारण म्हणजे ज्यावेळी बाइकवरून जाणाऱ्या दोन तरुणांना हा प्राणी दिसला तेव्हा त्यांना तो वाघ आहे, असं वाटलं. त्यावेळी त्यांनी सगळीकडे या परिसरात वाघ फिरत असल्याचं सांगितलं. त्यामुळे परिसरात वाघाची दहशत पसरली. पोलिसांनी या बातमीची दखल घेत, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना या प्रकरणाचा शोध लागला.

त्यावेळी पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे तो वाघ नसून कुत्रा असल्याची माहिती समोर आली. वाघ म्हणून दहशत पसरविणाऱ्या या कुत्र्याला वाघासारखा केशरी आणि काळ्या पट्ट्यांनी रंगवलेला होता. त्यामुळे तो दुरून पाहिल्यावर वाघासारखा दिसत होता. कुत्र्याला वाघासारखा रंग देण्याचं काम दोन तरुणांनी केलं होतं; ज्यांचा तपास पोलिस करीत आहेत.

या तपासासंदर्भात पोलिसांनी सांगितले, “या भागात वाघांचा अधिवास नाही. त्यामुळे या परिसरात वाघ फिरण्याची शक्यता नाही. काही बदमाशांनी भटक्या कुत्र्याला वाघासारखा रंग दिला; ज्याला रात्री अंधारात पाहिल्यावर तो वाघ आहे, असं वाटलं. त्याशिवाय या बदमाश तरुणांनी कुत्र्याला वाघासारखं रंगविल्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले; ज्यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला.”

हेही वाचा: ‘डिश ऑफ द इयर’, आइस्क्रीमवर टाकले चीज अन् बरेच काही; VIDEO होतोय तुफान व्हायरल

पाहा फोटो:

BCCL

दरम्यान, यापूर्वीदेखील काही वर्षांपूर्वी गोव्यातील एका शेतकऱ्यानं त्याच्या पाळीव कुत्र्याला वाघासारखं रंगवण्याची युक्ती केली होती. शेतातील पिकांचं नुकसान करणाऱ्या माकडांना पळवून लावण्यासाठी त्यानं ही कृती केली होती. या कुत्र्याला तो त्याच्यासोबत शेतात घेऊन जायचा, तेव्हा सर्व माकडं कुत्र्याला वाघ समजून पळून जायची.