भारतीय टीव्ही मालिकांचा बुद्धिमत्ता आणि तर्काशी काहीही संबंध नसतो हे सर्वांना माहीत आहे. गोपी बहू लॅपटॉप धुताना असो किंवा सिमरचे ‘माशी’मध्ये रूपांतर असो, आपण यापूर्वी टीव्हीवर विचित्र कथानक आणि दृश्ये पाहिली आहेत. आता असे दिसत आहे की भारतीय टीव्ही मालिकांची लोकप्रियता नायजेरियापर्यंत पोहोचली आहे. अलीकडे, भारतीय टीव्ही मालिकांमधील एका दृश्याचे नायजेरियन कंटेन्ट क्रिएटर्सनी विडंबन केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.
नेटकऱ्यांना पोट धरून हसायला भाग पडणाऱ्या या व्हिडीओमध्ये पॉल कास्टा नावाच्या एका निर्मात्याने प्रज्ञाचे पात्र साकार केले आणि पायऱ्यांवरून पडण्याचा अभिनय केला. यानंतर प्रज्ञाची बहीण तनु प्रज्ञाच्या पतीला फोन लावते, जो ऑफिससाठी निघालेला असतो. याचवेळी प्रज्ञाही पडत असते. कॉल उचलल्यानंतर प्रज्ञाचा पती तिला वाचवण्यासाठी धावत येतो. यावेळी तनु त्याच्याकडे बघतच राहते. जेव्हा प्रज्ञाचा पती राजू येतो आणि पायऱ्यांजवळ पोहोचतो, तेव्हा तो तिला पायऱ्यांवरून पडण्यापासून वाचवतो.
खालिद बेग नावाच्या एका ट्विटर यूजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, ‘एकता कपूरसाठी नायजेरियावरून प्रेम.’ हा व्हिडीओ एक लाखांहून पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि १२०० हून अधिक लोकांनी रिट्विट केला आहे. नेटिझन्सनी नायजेरियन निर्मात्यांच्या क्रिएटिव्हिटीचे कौतुक केले. स्वरा भास्करलाही व्हिडीओ आवडला. तिने हसणाऱ्या इमोजीसह लिहिले, ‘या आठवड्यात मी इंटरनेटवर पाहिलेली सर्वात चांगली गोष्ट.’