आपल्या निळ्या डोळ्याने पाकिस्तानच काय पण भारतातील मुलींना घायळ करणा-या पेशावरमधल्या चहावाल्याला एका ऑनलाइन वेबसाईटने मॉडलिंगची ऑफर दिली आहे त्यामुळे लवकरच स्टाईलिश कपडे घालून हा चहावाला वेबसाइटवर मॉडेलिंग करताना दिसणार आहे. दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तामधल्या जीया अली या छायाचित्रकार तरुणीने पेशावरमधील इतवार बाजारात चहा विकणा-या अर्शद खानचा फोटो टाकला होता. निळ्या डोळ्यांच्या या अर्शदनने पाकिस्तानीच काय पण सोशल मीडियावरच्या अनेक मुलींना भुरळ पाडली होती. दिवसभर सोशल मीडियावर तो चांगलाच चर्चेत राहिला होता. इतकेच काय पण त्याचे नाव आणि ‘चहावाला’ हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये आला. काहींनी तर त्याची तुलना बॉलीवूडच्या कलाकारांशी देखील केली. अर्शदच्या रुपाची इतकी चर्चा झाली की पाकिस्तानमधल्याच फिट इन या ऑनलाइन वेबसाईटने त्याला मॉडेलिंगची ऑफर देऊ केली आहे. चहावाला आता फॅशनवाला झाला आहे असे सांगत त्याची वेबसाइटसाठी मॉडेल म्हणून निवड केल्याची घोषणा या कंपनीने सोशल मीडियावर केली, त्यामुळे लवकरच अर्शद सगळ्यांना नव्या फॅशनेबल अवतारात पाहायला मिळणार आहे.
अर्शद हा फक्त १८ वर्षांचा आहे. त्याला १६ भावंडे आहेत आणि गेल्या २५ वर्षांपासून त्याचे कुटुंब इस्लामाबादमध्ये राहते. तीन महिन्यांपूर्वीच त्याने चहाचा गाडा सुरु केला होता. आपल्याला चित्रपटात काम करायचे आहे अशी इच्छाही त्याने बोलून दाखवली आहे. भारत किंवा पाकिस्तान कोणत्याही चित्रपट सृष्टीत काम मिळाले तरी आपण ते आवडीने करू असेही त्याने सांगितले.