सध्याच्या डिजिटल जमान्यात अनेक लोक आपणाला लागणाऱ्या वस्तू ऑनलाईन शॉपिंग साईट्सद्वारे मागवतात. पण ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या लोकांबरोबर असे अनेकदा घडते की, ते एक वस्तू ऑर्डर करतात आणि त्यांना मिळते वेगळीच वस्तू. यामध्ये कधी कोणाला चार्जर मागविल्यावर रिकामा बॉक्स मिळतो तर कोणाला मोबाईऐवजी वेगळेच काहीतरी मिळते. सध्या अशीच एक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने मोबाईल ऑर्डर केल्यानंतर त्याला अशा गोष्टीचं पार्सल मिळालं आहे, जे पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला आहे. हो कारण या व्यक्तीच्या घरी आलेल्या पार्सलमध्ये चक्क बॉम्ब आढळला आहे. त्याला पार्सलमध्ये एक काडतूस असल्याचे दिसले. ही धक्कादायक घटना मेक्सिको येथे घडली आहे. तर स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्वानाजुआटो येथील लिओन येथील एका अज्ञात व्यक्तीने दावा केला आहे की, त्याने मोबाईल फोन एका ऑनलाइन स्टोअरमधून ऑर्डर केला होता.

न्यूयॉर्क पोस्टने आपल्या अहवालात जॅम प्रेसचा हवाला देत म्हटलं आहे की, मागील सोमवारी जेव्हा या व्यक्तीच्या घरी पार्सल आले तेव्हा त्या व्यक्तीच्या आईने ते घरात नेले आणि किचन टेबलवर ठेवले. पार्सलमध्ये काय आहे हे त्यांना माहीत नव्हते. नंतर ते पार्सल उघडले तर त्यामध्ये ग्रेनेड असल्याचं कळालं. त्यांनी त्याचे काही फोटोही ऑनलाइन शेअर केले आहेत. तर घाबरलेल्या व्यक्तीने मोबाईल कंपनीशी संपर्क साधला. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाला त्याच्या घरी पाठवण्यात आले. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीच्या घराला घेराव घातला होता.

हेही पाहा- भल्यामोठ्या बैलाला कारमधून फिरवणाऱ्या व्यक्तीचा VIDEO व्हायरल, बैलाला बसण्यासाठी केलेला जुगाड पाहून थक्क व्हाल

प्रकरणाचा तपास सुरू –

हा बॉम्ब निकामी करण्यात लष्कराला यश आलं आहे. सध्या या पॅकेजची चौकशी सुरू असून ग्रेनेड पार्सलमध्ये कसे आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवाय मिळालेल्या ग्रेनेडवर मेक्सिकोमध्येही बंदी आहे. मात्र, देशात अमली पदार्थांची विक्री करणारे गट मोठ्या प्रमाणात असून ते आपापसात सतत भांडत राहतात. शिवाय एकमेकांना नष्ट करण्यासाठी ते बॉम्ब आणि इतर शस्त्रे वापरतात. गेल्या सहा वर्षांत, पोलिसांनी एकट्या गुआनाजुआटोमध्ये ६०० हून अधिक स्फोटके जप्त केल्याचंही सांगण्यात येत आहे.