Pakistan Flood Funny Video: पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसाने आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे मोठं संकट ओढावलं आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली, हजारो लोकांचं आयुष्य विस्कळीत झालं. अशा परिस्थितीत जिथं सरकारनं लोकांना दिलासा द्यायला हवा होता, तिथं त्यांच्या रक्षा मंत्र्यांच्या विधानाने सगळ्यांना धक्का बसला आहे.
पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. गावोगावी पाण्याने हाहाःकार माजवला आहे, शेतं उद्ध्वस्त झाली आहेत, घरे कोसळली आहेत आणि हजारो कुटुंबं उघड्यावर पडली आहेत. नागरिकांची दैनावस्था पाहून मन सुन्न होतं. पण, ज्या क्षणी लोकांना सरकारकडून मदतीची, धीर देणाऱ्या शब्दांची अपेक्षा होती, त्या क्षणी पाकिस्तानच्या रक्षा मंत्र्यांनी केलेलं एक विधान लोकांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या स्वरूपाचं ठरलं.
सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानातील एका न्यूज चॅनेलचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात दिसतं की, ते चॅनेलवर पूरस्थितीवर चर्चा सुरू असताना पाकिस्तानच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ फोनवरून सहभागी झाले. मात्र, ते जे काही बोलल्या त्याने लोकांचे डोळे विस्फारले.
पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या लोकांची वेदना पाहून सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी मंत्री महोदय थेट म्हणाले, “हे जे पाणी आहे ना ते स्टोअर करून ठेवा. जे लोक रस्ते अडवून बसलेत, त्यांनी हे पाणी आपल्या घरी घेऊन जावं आणि साठवून ठेवावं, या पाण्याला आपल्याला आशीर्वाद मानायला हवं; मोठे डॅम बांधून हे पाणी साठवायला हवं.”
आता कल्पना करा… एका बाजूला लोकांच्या घरांत पुराचे पाणी शिरलेलं, मालमत्तेचं मोठं नुकसान झालेलं, शेकडो कुटुंबं उद्ध्वस्त… आणि अशा वेळी त्यांचेच मंत्री म्हणतात की, “पुराचं पाणी म्हणजे आशीर्वाद आहे.”
हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केली. कुणी म्हणालं, “ही पाकिस्तानचीच विचारसरणी आहे, लोक बुडतायत तरी त्यांना आशीर्वाद दिसतोय.” तर कुणी विनोदी शैलीत लिहिलं, “पुराचं पाणी बालदी-टबमध्ये जमा करा, हाच उपाय आहे.”
काहींनी तर सरळ टोला लगावला की – “रक्षा मंत्री आता वैज्ञानिक झालेत बहुतेक.” तर इतरांनी लिहिलं, “बिचाऱ्यांचा मानसिक तोल गेलेला दिसतो.”
येथे पाहा व्हिडीओ
व्हिडीओला प्रचंड व्ह्युज मिळाले असून, लोक तो सतत शेअर करत आहेत. पाकिस्तानच्या लोकांचं म्हणणं आहे की सरकारकडून मदत मिळणं तर दूरच, पण अशा विचित्र विधानांनी त्यांची चेष्टा केली जात आहे.