एका प्रवाशाने स्टेशनवरुन समोसा घेतला पण डिजिटल पेमेंट झालं नाही. तो प्रयत्न करत होता पण पेमेंट फेलचा मेसेज आला ज्यानंतर समोसा विकणाऱ्या विक्रेत्याची कॉलर पकडली या प्रवाशाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कुठे घडली घटना?

प्रवाशाचं डिजिटल पेमेंट फेल गेल्याने त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना जबलपूर रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर घडली. सुरुवातीला समोसा विक्रेत्याचा आणि प्रवाशाचा वाद झाला. पण त्यानंतर वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओत काय दिसतं आहे?

व्हायरल व्हिडीओत हे दिसतं आहे एक प्रवासी प्लॅटफॉर्मवर समोसा विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडून समोसा विकत घेतो आणि डिजिटल पेमेंट करतो.

डिजिटल पेमेंट झालं असं वाटून प्रवासी पुढे जातो, पण समोसा विक्रेत्याला पैसे येत नाहीत त्यामुळे तो त्या प्रवाशाला खेचतो आणि पेमेंट करायला सांगतो. पण पेमेंट होत नाही.

त्यानंतर हा विक्रेता समोसा विकत घेणाऱ्या प्रवाशाची कॉलर पकडून त्याला मारहाण करु लागतो आणि अर्वाच्य भाषेत त्याच्याशी बोलू लागतो.

समोसा विक्रेत्याने या प्रवाशाचं घड्याळही हिसकावून घेतलं. या सगळ्या घटना या व्हिडीओत समोर आल्या आहेत.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर सदर विक्रेत्याचा विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसंच रेल्वे कायद्याच्या अंतर्गत या समोसा विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. संदीप गुप्ता असं या समोसा विक्रेत्याचं नाव आहे.

रेल्वेच्या अधिकाऱ्याने काय सांगितलं?

संदीप गुप्ता नावाचा समोसा विक्रेता जबलपूरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वर समोसे विकत होता. त्यावेळी डिजिटल पेमेंट न झाल्याने एका प्रवाशाला त्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर या विक्रेत्याची ओळख पटवण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. संदीप गुप्ता असं त्याचं नाव आहे. त्याचा विक्री परवानाही रद्द करण्यात आला आहे अशी माहिती रेल्वे पोलिसांनी ANI ला दिली.