Peacock spotted near railway track: कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावरील प्रवाशांना एक दुर्मिळ दृश्य अनुभवता आले. कर्जत-खोपोली रेल्वे ट्रॅकदरम्यान एक मोर वावरताना प्रवाशांना दिसला. हे दृश्य काल २० ऑक्टोबर रोजी दिसले. त्यावेळी प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून या मोराचा वावर कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर याचे व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. यावेळी मोटरमन सतर्क असल्याने त्याने लोकल थांबवली. याबाबत मोटरमनचे सोशल मीडियावर कौतुकही होत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, एक प्रवासी ट्रेन येत असताना अचानक हा मोर रूळांवर दिसला. लगेचच मोटरमनने मोराला वाचवण्यासाठी म्हणून ट्रोन थांबवली. काही मिनिटांसाठी प्रवासी आश्चर्याने या मोराकडे पाहत होते. कारण हा मोर शांतपणे रेल्वे रूळांवरून चालत होता आणि काही वेळाने तो निघून गेला. भिसेगाव रेल्वे ट्रॅक परिसरात हा मोर दिसला.
रेल्वे रूळांवर अचानक मोर दिसल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे एक दुर्दैवी अपघात टळला. सोशल मिडिया युजर्सनी मोटरमनची संवेदनशीलता आणि स्थानिक प्रवासाच्या दैनंदिन गर्दीत दिसणारे दुर्मिळ नैसर्गिक सौंदर्य यांचे कौतुक केले आहे.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील जंगली आणि डोंगराळ प्रदेशांजवळ असलेल्या कर्जत-खोपोली पट्ट्यात कधीकधी मोर दिसतात. असं असताना सक्रिय रेल्वे मार्गाच्या इतक्या जवळ मोर दिसणे ही काही सामान्य बाब नाही. यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मोराच्या ठिकाणी माणूस असता तर दिला असता उडवून अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, कदाचित या मोराला माहीत आहे की सेंट्रल रेल्वे कधी वेळेत चालत नाही म्हणूनच तो इतक्या निवांत फिरत आहे.
अशा काही घटना इतर ठिकाणीही घडल्या असल्याचे वृत्त आपण वाचतो. मात्र, हे सौंदर्य सत्य होते अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.