सध्या एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावर एका शाळेच्या नर्सरी आणि छोटा शिशु वर्ष २०२४-२५ साठीच्या शुल्करचनेचा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोमध्ये ज्युनियर केजी आणि नर्सरी वर्गासाठीच्या शुल्करचनेमध्ये पालक-शिक्षकांच्या सभेसाठी चक्क ८,४०० रुपये शुल्क आकारले गेल्याचे पाहायला मिळाल्याने नेटकऱ्यांना चांगलाच धक्का बसलेला आहे. मात्र, या फोटोमध्ये ही शाळा नेमकी कुठली आहे ते समजत नाही.
एक्स या सोशल मीडियावरून राजा बाबू @gaurangBhardwa1 या हॅण्डलने, “आज मला समजले की, माझ्या वडिलांनी मला सरकारी शाळेत का टाकले ते,” अशा कॅप्शनसह हा फोटो शेअर केला गेला आहे. पालक सभेच्या शुल्कासोबतच प्रवेश शुल्क, वार्षिक शुल्क यांसारख्या इतर सर्व गोष्टींबद्दलचीही माहिती या फोटोमधून आपल्याला मिळते. परंतु, या सर्वांच्या शेवटी एकदाच भराव्या लागणाऱ्या पालक सभेच्या शुल्काचा रकाना पाहायला मिळतो; ज्यामध्ये ८,४०० रुपये इतकी रक्कम नमूद केलेली आहे. सर्व शुल्कांच्या रकमांची बेरीज केली असता, एकूण वार्षिक शुल्क हे एक लाख ५१ हजार ६५६ रुपये इतके होत असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : ‘या’ देशात विकली जाते चक्क ‘गुलाबजाम कॉफी’! पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ व्हिडीओ….
सोशल मीडियावरील सर्व नेटकरी हा फोटो पाहून चांगलेच चकित झाल्याचे समजते. या फोटोखालील प्रतिक्रियांमधून काहींना ही शाळा कोणती आहे ते जाणून घेण्याची इच्छा आहे. तर, काही जण यावर विनोद करीत आहेत. तर काहींना, पालक सभेचे शुल्क हा प्रकार म्हणजे नेमके काय आहे हेच माहीत नाहीये. नेटकऱ्यांचे या सर्व प्रकरणावर काय म्हणणे आहे ते पाहा.
एकाने, “ही पालक सभेची फी माझ्या बी.टेक.च्या फीपेक्षासुद्धा जास्त आहे,” असे लिहिले आहे. तर दुसऱ्याने, “मी तर नर्सरीच्या वर्गासाठी एक लाख ९५ हजार इतका खर्च केला आहे. त्यामध्ये जेवण, प्रवास या सर्व गोष्टींचा समावेश आहे,” असे लिहिले आहे. तिसऱ्याने, “मी जेव्हा दहावीमध्ये होतो, तेव्हा माझी महिन्याची ५०० रुपये फी असायची. तेव्हा मला ती महाग वाटत असे,” अशी कमेंट केली आहे. “आमच्या शहरामध्येही एक खासगी शाळा आहे. त्यामुळे ही फी पाहून त्या मुलाचे पालक एवढी फी कशी भरू शकतात, असा प्रश्न पडला आहे,” अशी प्रतिक्रिया चौथ्याने व्यक्त केली.