Policeman Beaten Video Viral : सोशल मीडियावर भांडण, मारामारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा पोलिसांबरोबरच्या भांडणाचे व्हिडीओ असतात. या व्हिडीओंमध्ये कधी पोलीसच कायदा हातात घेताना दिसतात. तर कधी लोक ?कायदारक्षकावरच हात उचलताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात पेट्रोल पंपावरील कर्मचारी पोलिसांच्या खाकी वर्दीवर हात उचलताना दिसतायत. एखाद्या अॅक्शन चित्रपटातील दृश्याप्रमाणे हे दृश्य आहे. त्यात कर्मचारी पोलिसाला एकामागोमाग एक सतत कानशिलात लगावताना दिसतायत. यावेळी पेट्रोल पंपावरील उपस्थित लोकांनी या प्रसंगाचा व्हिडीओ शूट करून, तो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामुळे पोलिसाला होत असलेल्या मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. दरम्यान, अनेकांनी वर्दीवर हात टाकण्याची एवढी हिंमत येते कुठून, असा सवाल केला आहे.
व्हिडीओमध्ये दिसतेय की, एक पोलीस पेट्रोल पंपावर उभा आहे आणि तिथे उपस्थित असलेले कर्मचारी त्याच्याशी जोरजोरात भांडताना दिसत आहेत. ते नुसते भांडत नाहीयेत, तर चक्क पोलिसाचा हात पकडून त्याच्या कानशिलात लगावतायत. पेट्रोल पंपावरील लोकांसमोर ही सर्व हाणामारी सुरू आहे. ते दोन कर्मचारी एकेक करुन पोलिसाच्या कानाखाली मारू लागतात. अशा प्रकारे दोघे सात ते आठ वेळा पोलिसाच्या कानाखाली लगावतात.
असे सांगितले जाते की, व्हिडीओतील पोलिसाने १२० रुपयांचे पेट्रोल भरण्यास सांगितले होते; परंतु कर्मचाऱ्याने चुकून किंवा जाणूनबुजून ७२० रुपयांचे पेट्रोल टाकीत भरले. यावेळी पोलिसाने चिडून एका कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारली. त्यानंतर प्रकरण वाढत गेले.
पंपावरील एका कर्मचाऱ्याला मारल्यानंतर इतर कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसाला सर्व बाजूंनी घेरले. त्यानंतर जे घडले, ते व्हिडीओत दिसतेय. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर लोक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. अनेकांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना कायदा हातात घेण्याची परवानगी आहे का, असा सवाल केला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी व्हिडीओला लाइकदेखील केले आहे. ज्यावर युजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, पोलिसांनी आपली इमेज सुधारण्याचा प्रयत्न करावा. दुसऱ्याने लिहिले की, असे काय आहे की, जेव्हा जेव्हा पोलिसाला मारहाण होते तेव्हा तेव्हा जनता आनंदी होते. याबाबत विचार करण्याची गरज आहे. तर शेवटी एकाने लिहिले की, पेट्रोल पंप सील केले पाहिजेत.