‘प्रेम करायला वयाचं बंधन नसतं’ असं म्हटलं जातं, या ओळीला साजेसं एक उदाहरण समोर आलं आहे. सध्या एका वृद्ध आजी-आजोबांच्या प्रेम कहाणीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. कारण या दोघांमधील प्रेम ६३ वर्षांनंतरही कमी झालेलं नाही. या दोघांची हायस्कूलमध्ये शिकत असताना ओळख झाली होती, याचवेळी त्यांचा एकमेकांवर जीव जडला होता. परंतु काही कारणांमुळे त्यांचे एकमेकांशी लग्न होऊ शकले नाही. पण आता जवळपास ६३ वर्षांनी ते दोघे लग्न करणार आहेत. त्यांच्या या अनोख्या निर्णयाचे नेटकऱ्यांनी खूप कौतुक केलं आहे.
ही घटना अमेरिकेत राहणाऱ्या ७८ वर्षांच्या थॉमस मैकमीकिन आणि नैन्सी गैम्बेल यांच्याशी संबंधित आहे. ६० च्या दशकात हे दोघे एकमेकांना भेटले होते. थॉमस पहिल्या नजरेत नैन्सीच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी ते हायस्कूलमध्ये शिकत होते. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढत गेली. मात्र, शाळा संपल्यानंतर दोघेही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये गेले. तरीही ते अधुमधून एकत्र फिरायला किंवा पार्टी करायला जायचे.
पंरतु नैन्सी आणि थॉमस यांची वेगळी लग्न झाल्यानंतर या दोघांमध्ये अनेक वर्ष कोणताही संपर्क झाला नाही. पण ते २०१२ मध्ये स्नेहसंमेलनात पुन्हा ते एकमेकांना भेटले. यावेळी त्यांच्यात बोलणंही झाले. आता नशिबाने या दोघांना पुन्हा एकत्र आणलं आहे. हो कारण नैन्सीच्या पतीचे निधन झाले आणि थॉमस यांची पत्नी पण आता या जगात राहिली नाही. अशा परिस्थितीत या दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, ज्याला त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील होकार दिला. एवढेच नाही तर नैन्सीला भेटण्यासाठी पूर्ण प्लॅनिंगदेखील करण्यात आलं होतं. यावेळी थॉमस यांनी फिल्मी स्टाईलमध्ये त्याच्या क्रशला प्रपोजही केलं.
यावेळी थॉमसने एका गुडघ्यावर बसून नैन्सीला प्रपोज केले. ते दोघे एकमेकांना भेटल्याचा आणि थॉमसने प्रपोज केल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @magicallynews नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय अनेक नेटकरी या व्हिडीओवर वेगवेळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं आहे, मला त्यांची लव्ह स्टोरी जाणून घ्यायची आहे. तर दुसऱ्या एकाने कधीही आशा सोडू नका, अशी कमेंट केली आहे.
या जोडप्याने ‘फॉक्स १३’ ला सांगितले की ते लवकरच कॅलिफोर्नियामध्ये लग्न करण्याचा विचार करत आहेत. थॉमसने सांगितलं, “नैन्सी माझी क्रश होती. ती एक सुंदर आणि दयाळू मनाची स्त्री आहे. आम्ही कॉलेजमध्ये एकमेकांना डेटपण केलं होतं आणि नंतर आमचं ब्रेकअप झालं. पण सुदैवाने पुन्हा आम्ही एकत्र आलो, असे वाटतं की आम्ही दोघे एकमेकांसाठीच बनलो आहोत. आता मला माझे उर्वरित आयुष्य नैन्सीसोबतच घालवायचे आहे.”