आजच्या धावपळीच्या काळात खासगी क्षेत्रात नोकरी करणं म्हणजे तारेवरची कसरत असते. खासगी क्षेत्रात काम करत असताना अनेकदा कामाचे टार्गेट दिले जाते. मात्र, कामगारांकडून अनेकादा कामाचे टार्गेट पूर्ण होत नाही. त्यामुळे कामगारांना बॉसच्या जाचाला सामोरे जावे लागते. असाच एक प्रकार पुण्यात समोर आला आहे. एका तरुणाने बॉसच्या जाचाला कंटाळून कामाचा राजीनामा दिला. तसेच शेवटच्या दिवशी थेट ढोलताशा वाजवत कामाचा शेवटचा दिवस साजरा केला. सध्या या तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं ?
पुण्यातील एका खासगी कंपनीत अनिकेत नावाचा तरुण गेल्या जवळपास तीन वर्षांपासून सेल्स असोसिएट म्हणून काम करत होता. मात्र, त्याला अपेक्षित अशी पगारवाढ गेल्या तीन वर्षात मिळाली नाही. त्यामुळे तो निराश झाला होता. यातच रोजच्या कामाचा लोड आणि बॉसच्या जाचाला कंटाळून त्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेताल. त्यानंतर त्याने राजीनामा दिला. मात्र, आपल्या कामाच्या शेवटच्या दिवशी त्यांने केलेल्या आगळ्या वेगळ्या निरोपाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
अनिकेतने कामाच्या शेवटच्या दिवशी ऑफिसच्या बाहेर थेट ढोलताशा वाजवत आपल्या ऑफिसचा शेवटचा दिवस साजरा केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्याबरोबर ऑफिसमधील त्याचे काही सहकारीही ढोलताशावर मनसोक्त नाचताना दिसून येत आहेत. मात्र, यावेळीही त्यांचा बॉस त्यांना ओरडताना दिसत आहे.
दरम्यान, सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हा तरुण चांगलाच चर्चेत आला आहे. खरं तर नोकरी सोडताना शेवटचा दिवस अनेक आठवणी देऊन जाणारा ठरतो. मात्र, या तरुणाने आपल्या कामाचा शेवटचा दिवस ज्या पद्धतीने साजरा केला ते अनेकजण पाहातच राहिले. हे पाहून त्या तरुणाचा बॉसही आश्चर्यचकित झाला होता.