IPopstar Singer Radhika Bhide : सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक मराठमोळी मुलगी सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. तिचा आवाज, तिचं भावपूर्ण गाणं आणि तिच्या सादरीकरणातली ती खरी भावना. ‘मन धावतंया तुझ्याच मागं, डोलतंया तुझ्याचसाठी…’ हे गाणं ऐकून सोशल मीडियावर अक्षरशः भावनांचा स्फोट झाला आहे.
हा जादुई आवाज आहे राधिका भिडे हिचा. आय-पॉपस्टार या रिअॅलिटी शोमधली स्पर्धक, जिनं आपल्या गायकीनं परीक्षकांना भावूक केलं आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या गाण्याचे व्हिडीओ लाखो वेळा पाहिले जात आहेत आणि तिच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्यानौ वाढतेय. काही क्षणांतच ती महाराष्ट्राची ‘फेव्हरेट व्हॉइस’ बनली आहे.
आता या मराठमोळ्या गायिकेचं नवं गाणं ‘थोडे थोडे वाटे जग नवे’ प्रदर्शित झालं असून, त्यानं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या परफॉर्मन्सदरम्यान आय-पॉपस्टारचे परीक्षक पवन सिंह, आदित्य रिखाडी व अर्पण चंदेल हे तीनही कलाकार तिच्या आवाजानं अक्षरशः भावूक झाले. राधिकाचा हा नवा परफॉर्मन्स संपल्यानंतर काही क्षण प्रेक्षक आणि परीक्षक दोघेही शांत राहिले. तिच्या आवाजातील भावनांनी सगळ्यांच्या डोळ्यांतून अश्रू उभे राहिले
पाहा व्हिडिओ
तिनं आपल्या गाण्याद्वारे परीक्षकांच्याही डोळ्यांत पाणी आणलं. ते मनापासून म्हणाले, ”मी एवढा छान परफॉर्मन्स कधी पाहिला नाही. मी तुझा फॅन झालो आहे.” एवढंच नव्हे तर , “तू खरंच कमाल आहेस, तुमच्या आवाजासमोर संपूर्ण दुनिया पागल होईल.” त्यांच्या या प्रतिक्रियांनंतर स्टेजवर टाळ्यांचा कडकडाट झाला.
राधिकाचं हे गाणं ‘थोडे थोडे वाटे जग नवे’ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या काही दिवसांतच दुपटीने वाढली असून, तिच्या प्रत्येक पोस्टवर हजारो लोक प्रतिक्रिया देत आहेत आणि शेअर करीत आहेत. चाहत्यांनी तिचं वेगवेगळ्या शब्दांत, वाक्यांत कौतुक केल आहे एकानं म्हटलं, “हा आहे रत्नागिरीचा आवाज”, तर दुसऱ्यानं म्हटलं, “खूप गोड आवाज कान, मन तृप्त झाले” तर एकानं कोकणची कन्या म्हणत, “नितळ सादगी, गोड आवाज हा आहे कोकणचा म्हणजे आमच्या रत्नागिरीचा साज”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या नव्या गाण्यामुळे राधिका भिडेनं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, खरी कला आणि भावनांनी भरलेला आवाज नेहमी लोकांच्या मनात घर करतो. तिच्या गायकीचा हा प्रवास आता एका नव्या उंचीवर पोहोचतोय आणि प्रेक्षकांना तिच्या पुढच्या परफॉर्मन्सची आतुरतेनं वाट पाहायला लावतोय.
