काँग्रेसमधील बंडखोर ‘जी-२३’ गटाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका करत पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. अशातच केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी आपल्या खास शैलीमध्ये कविता सादर करत आझाद यांना थेट पक्ष प्रवेशाची ऑफर दिली आहे.
नक्की वाचा >> “गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील”; राजीनाम्याच्या दुसऱ्याच दिवशी विधान
संघटनात्मक बदल करण्याबरोबरच पक्ष कार्यकर्त्यांसाठी पूर्णवेळ उपलब्ध अध्यक्ष नियुक्त करण्याची मागणी ‘जी-२३’ गटाने केली होती. सोनिया गांधी यांना ऑगस्ट २०२० मध्ये लिहिलेल्या पत्रानंतर बंडखोर गटाचा पक्षांतर्गत संघर्ष सुरू होता. या गटाचे म्होरके असलेले आझाद यांनी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त करून अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली. याच घडामोडीवर आठवले यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन एक चारोळी शेअर केली आहे.
नक्की वाचा >> गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडला, पृथ्वीराज चव्हाणांच्या नाराजीची सुद्धा चर्चा; फडणवीस म्हणाले, “काँग्रेसची परिस्थिती…”
“आजाद को बहुत सालों बाद मिली आजादी। गुलाम नबी अब नहीं रहे राहुलवादी, अब उनको मिल गयी सही आजादी। जम्मू कश्मीर की खुश है दादी, राहुल गांधी की छीन ली है गादी।” अशी चारोळी आठवलेंनी केली आहे. तसेच गुलाम नबी आझाद हे भाजपामध्ये येणार असतील किंवा आरपीआयमध्ये येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे असंही आठवलेंनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आठवले हे त्यांच्या अशाच कवितांची प्रसिद्ध आहेत. राज्यसभेपासून ते पत्रकार परिषदांमध्येही आठवले अशापद्धतीने कविता सादर करत विषयांवर मार्मिक पद्धतीने नेहमीच भाष्य करताना दिसतात.