बेंगळुरूमध्ये एका महिला प्रवाशाने रॅपिडो ऑटोचालकाविरोधात छळ आणि धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राईड रद्द करणे आणि अतिरिक्त वेटिंग शुल्क आकारण्याच्या मुद्द्यावरून ऑटोचालक आणि महिला प्रवाशामध्ये वाद झाला. व्हिडीओ समोर आल्यानंतर रॅपिडो कंपनीने तत्काळ चालकावर कारवाई करत त्याला निलंबित केले असून, पोलिसांनीही या घटनेची दखल घेतली आहे.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसते की महिला प्रवासी आपल्या घराबाहेरून ऑटो बुक करते. ती दोन मिनिटांत बाहेर येईल असे चालकाला सांगते. मात्र, ती बाहेर आली तेव्हा चालक तिला सांगतो की दोन मिनिटांच्या प्रतीक्षेसाठी तिला अतिरिक्त पैसे द्यावे लागतील, यावरून दोघांमध्ये वाद होतो. प्रवासी महिला अतिरिक्त पैसे देण्यास नकार देते आणि चालकाला राइड रद्द करण्यास सांगते.
जेव्हा वाद वाढतो तेव्हा चालक आक्रमक होतो आणि महिलेला धमकी देतो की, “तू कशी जाते ते मी पाहतोच.” तिची सुरक्षितता धोक्यात आहे असे वाटून, ती महिला संपूर्ण घटना तिच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड करते. व्हिडीओमध्ये चालक सतत अतिरिक्त पैसे मागत असल्याचे आणि महिला शांतपणे त्याच्याशी वाद न घालता परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. शेवटी तिने परिस्थिती आजून वाढू नये म्हणून २० रुपये अतिरिक्त पैसे दिले आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
पाहा व्हिडिओ
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रॅपिडो कंपनीने तातडीने प्रतिसाद दिला. कंपनीने त्या महिलेशी संपर्क साधून तपास सुरू केला आणि संबंधित चालकाला तत्काळ निलंबित केले. महिलेनं पोस्ट करताना लिहिलं, “@rapidobikeapp टीमने माझ्याशी संपर्क साधून कारवाई केली आहे, माझ्या सुरक्षेबाबतही त्यांनी खात्री दिली.”
दरम्यान, बेंगळुरू सिटी पोलिसांनीही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘@BlrCityPolice’ अकाउंटवरून लिहिले, “कृपया आपला संपर्क क्रमांक आणि घटनेचे ठिकाण डीएमद्वारे शेअर करा.” महिलेनं त्यास प्रतिसाद देत सर्व व्हिडीओ आणि तपशील पोलिसांना दिले असल्याचे सांगितले.
या व्हिडीओनंतर नेटिझन्समध्ये मतभेद दिसून आले. काहींनी महिलेला समर्थन देत रॅपिडोवर अधिक कडक कारवाईची मागणी केली, तर काहींनी चालकाचे समर्थन करत प्रतीक्षेसाठी शुल्क घेणे योग्य असल्याचे मत व्यक्त केले. मात्र, बहुतेक लोकांनी महिला प्रवाशाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत वाहतूक सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी आपल्या चालकांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या घटनेने पुन्हा एकदा अॅप-आधारित वाहतूक सेवांमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आणला आहे. नागरिकांनी प्रशासन आणि कंपन्यांनी अशा घटनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
