कधी कोणी हेलिकॉप्टरमध्ये तर कोणी एखाद्या गडावर जाऊन लग्न केल्याचे आपण ऐकले असेल. मात्र, एखाद्या ध्रुवावर कोणी लग्न केल्याचे कधी ऐकिवात आहे? पण ‘ब्रिटिश आर्कटिक टेरिटरी’ गाईड म्हणून काम करणाऱ्या दोन जणांनी हे प्रत्यक्षात करुन दाखवले आहे. अशा प्रकारे अंटार्क्टिकावर लग्न करणारे हे पहिलेच जोडपे ठरले आहे. टॉम सिल्वेस्टर आणि जुली बॉम असे या दोघांचे नाव आहे.

जुली हिने लग्नासाठी घातलेला ड्रेस नारंगी रंगाचा होता. विशेष म्हणजे हा ड्रेस एका जुन्या टेंटपासून बनविण्यात आला होता. लग्न लागत असताना त्या ठिकाणचे तापमान ० ते ९ डिग्री सेल्सिअस इतके कमी होते, असे बीबीसीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. मात्र, या जोडप्याने अशापद्धतीने दक्षिण ध्रुवावर लग्न का केले? असा प्रश्न त्यांना विचारला असता सिल्वेस्टर म्हणाला, अंटार्क्टिका  ही अतिशय उत्तम जागा आहे. आम्ही दोघांनी याठिकाणी चांगले मित्र जमवले आहेत. लग्नासाठी याशिवाय आणखी कोणतीच चांगली जागा होऊ शकत नाही. आपण लग्न अतिशय छोट्या स्वरुपात करु, असे आम्ही दोघांनी सुरुवातीपासूनच ठरवले होते मात्र, अशाप्रकारे इतक्या निर्जन स्थळी आम्ही ते करु अशी कल्पनाही केली नव्हती.

जुली म्हणाली, मागच्या १० वर्षांपासून मी आणि टॉम एकत्रित काम करत असून, कामानिमित्ताने जगभरात आम्ही प्रवास करतो. तीन वर्षांपूर्वी आम्ही साखरपुडा केला होता. अशाप्रकारे लग्न करणे हे आमच्या दोघांसाठी अतिशय आनंददायी आहे. लग्नासाठी अंटार्क्टिकावरील २० जण उपस्थित होते. इतकेच नाही तर सिल्वेस्टर याने लग्नासाठी इथेच पितळ्याच्या अंगठ्या बनवल्या आहेत. हे दोघेही इंग्लंडमध्ये राहणारे असून, सिल्वेस्टर शेफील्ड येथील तर जुली बर्मिंगहममधील आहे. त्यांच्या लग्नाची नोंदणी ‘ब्रिटिश आर्कटिक टेरिटरी’मध्ये झालेली असून, ब्रिटन सरकारकडेही त्याची नोंद आहे