मध्य प्रदेशातील मुरैना येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्याची चर्चा सध्यो मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ती म्हणजे येथील एका स्वयंपाकीला साप चावला होता. धक्कादायक बाब म्हणजे त्याला साप चावल्याचा इतका राग आला की त्याने चक्क लाटण्याने सापाला जागीच ठार केलं आणि त्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मेलेला साप भरला आणि तो थेट डॉक्टरांकडे घेऊन गेला. आश्चर्याची बाब म्हणजे या स्वयपाकीने मेलेला साप डॉक्टरांच्या टेबलावर ठेवत म्हणाला, “डॉक्टर, हा साप मला चावला आहे, माझ्यावर उपचार करा” टेबलावर ठेवलेला साप बघून डॉक्टर मात्र चांगलेच घाबरले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मुरैना जिल्हा रुग्णालयाशी संबंधित असून येथील एका कोल्ड स्टोअरमध्ये शैलेंद्र सिंग नावाचा तरुण स्वयंपाकी म्हणून काम करतो. शैलेंद्र रविवारी सकाळी जेवण बनवत असताना त्याला काहीतरी चावल्याचं जाणवलं. यावेळी त्याने नीट पाहिलं असता त्याला एक साप दिसला. शैलेंद्रला हाच साप चावल्याचं समजताच तो खूप रागवला आणि त्याने थेट हातातील लाटण्याने सापाला मारायला सुरुवात केली. त्याने सापाला इतक्या जोरात मारलं की सापाचा जागीच मृत्यू झाला. शिवाय सापाला मारुन शैलेंद्र शांत बसला नाही तरी त्याने मेलेला साप एका प्लास्टिकच्या पिशवीत भरला आणि तो जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या केबिनमध्ये घेऊन गेला.

हेही पाहा- “कुल्फी घ्या… कुल्फी घ्या”, डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानात विकतायत आइस्क्रीम? ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

डॉक्टरांच्या टेबलावर ठेवला साप –

शैलेंद्रने प्लास्टिकच्या पिशवीतून मेलेला साप बाहेर काढला आणि डॉक्टरांच्या टेबलावर ठेवला. यावेळी तो डॉक्टरांना म्हणाला, “मला हा साप चावला आहे. माझ्यावर उपचार करा” टेबलावरील साप पाहून डॉक्टर घाबरले. परंतु तो साप मेल्याचं सांगितल्यावर डॉक्टरांना दिलासा मिळाला आणि त्यानंतर त्यांनी शैलेंद्रवर उपचार करायला सुरू केली.

लोकांना बसला आश्चर्याचा धक्का –

डॉक्टरांनी शैलेंद्रवर उपचार केले असून तो आता पूर्णपणे बरा असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पण, या अनोख्या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टरांसह अन्य नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला होता, त्यामुळे सध्या या घटनेची सोशल मीडियावर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.