चंदिगडमधील मनीमाजरा भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रस्त्याने जाताना अचानक एका घराच्या छताचा काही भाग रस्त्यावर जाणाऱ्या महिला आणि दोन मुलांच्या अंगावर कोसळला. त्यानंतर तिघेही मोठ्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. हा अपघात रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो व्हिडीओ आता काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मनीमाजरा भागात एक जुने घर पाडले जात असताना ही दुर्घटना घडली. घर पाडणाऱ्या ठेकेदाराने रस्त्यावर धोक्याचा इशारा फलकही लावला नव्हता; ज्यामुळे लोकांची ये-जाही सुरूच होती. अपघाताच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घराचे पाडकाम सुरू असताना एक महिला आणि दोन शाळकरी मुले रस्त्याने जात होती. त्याच वेळी अचानक घराच्या छताचा काही भाग कोसळून त्यावेळी गल्लीतून जाणाऱ्या महिला आणि तिच्या दोन मुलांच्या अंगावर पडला. यावेळी महिला आणि दोन मुले छताचा ढिगाऱ्याखाली गाडले गेली. या अपघातात ठेकेदाराचा निष्काळजीपणा समोर आला आहे. या ह्रदयद्रावक घटनेवर आता सोशल मीडियावरूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.
ढिगाऱ्याचा मोठा भाग महिलेच्या अंगावर पडला असून, तिची प्रकृती गंभीर आहे. त्यांना चंदिगडच्या पीजीआयएमईआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही मुलांनाही गंभीर दुखापत झाली असून, त्यांनाही हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. अपघाताचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी घरमालक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातासंबंधीचा तपास करण्यात येत आहे.