Train shocking video: अलीकडच्या काळात रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दररोज कुठे ना कुठे प्रवासी चालत्या गाडीत चढताना किंवा उतरताना जखमी होतात, काहींचे प्राणही जातात. निष्काळजीपणामुळे होणाऱ्या या दुर्घटना चिंतेचा विषय ठरत आहेत. अशाच एका प्रसंगात तमिळनाडूमधील एरोड रेल्वेस्थानकावर आरपीएफ जवानाच्या तत्परतेमुळे एक दुर्घटना टळली. या जवानाने क्षणाचाही विलंब न करता धाव घेत एका महिलेचा जीव वाचवला. रेल्वे मंत्रालयाने स्वतः हा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत नागरिकांना सतर्कतेचा संदेश दिला आहे.
हा व्हिडीओ एरोड जंक्शनवरील एका महिला प्रवाशाचा आहे. ती महिला चालत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या फूटबोर्डमधील जागेत अडकण्याची शक्यता निर्माण झाली. काही सेकंदांतच ती खाली घसरली आणि तिचा जीव धोक्यात आला. त्याच वेळी प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या आरपीएफ जवानाने तिच्याकडे धाव घेतली आणि तिला सुरक्षित ठिकाणी खेचले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
व्हिडीओत एक महिला प्रवासी गाडी सुटत असतानाच डब्यात चढण्याचा प्रयत्न करताना दिसते. तिचा तोल सुटून ती ट्रेनखाली ओढली जाणार होती; पण लगेच धावत आलेल्या एका आरपीएफ जवानाने तिला पकडले आणि सुरक्षित ठिकाणी नेले. तो सैनिक इतक्या तातडीने कृती करतो की, त्यामुळे होणारा एक भयानक अपघात टळतो. व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करीत आरपीएफ जवानाचे कौतुक केले आहे. या घटनेनंतर “तुमची सुरक्षितता तुमच्या हातात आहे. चालत्या गाडीत चढू नका किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नका”, असा महत्त्वाचा संदेश पुन्हा अधोरेखित करण्यात आला आहे.
पाहा व्हिडिओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हजारो लोकांनी त्या जवानाचे कौतुक केले असून, त्याला “रिअल लाइफ हीरो” म्हणून संबोधले आहे. अनेकांनी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या जागरूकतेचे कौतुक करीत, “अशा जवानांमुळेच अनेकांचे जीव वाचतात” असे म्हटले आहे. काहींनी या व्हिडीओच्या माध्यमातून प्रवाशांना संदेश दिला की, चालत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळणे आहे.
दरवर्षी भारतीय रेल्वेत अनेक प्रवासी चालत्या गाडीमध्ये चढताना किंवा उतरताना अपघातग्रस्त होतात. एरोड रेल्वेस्थानकावरील हा प्रसंग म्हणजे केवळ एका महिलेचा जीव वाचवणारा नाही, तर सर्व प्रवाशांसाठी एक गंभीर इशारा आहे. रेल्वे मंत्रालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे — “तुमची सुरक्षितता तुमच्याच हातात आहे. त्यामुळे गाडी पूर्ण थांबल्याशिवाय चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नका.”
