Gurgaon Floods Viral Video : सध्या देशभरातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील काही ठिकाणी इतका पाऊस झाला की, पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. विशेषत: शहरी भागात गटार, नदी-नाल्यांमधील गाळ न उपसल्याने लोकांच्या घरात पाणी शिरलंय. अशात सोशल मीडियावर सध्या तब्बल १०० कोटी रुपयांच्या एका घराचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्याची पावसामुळे अशी काही अवस्था झाली आहे की, तुम्ही त्याबाबत विचारही करू शकणार नाही.
हा व्हिडीओ गुडगावमधील आहे, ज्यात शहरातील खराब ड्रेनेज सिस्टीममुळे १०० कोटींच्या घराचे आणि त्यातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. sanchiarora.30 नावाच्या एका महिलेने तिच्या या घराचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यावर लोकही तीव्र प्रतिक्रिया नोंदवीत आहेत.
संबंधित महिलेने व्हिडीओसह कॅप्शनमध्ये घडलेला प्रकार सांगितला आहे. तिने लिहिलेय की, काल रात्री जे घडले, त्यामुळे मी पूर्णपणे हादरून गेली आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना माहीत असेलच की, कालचे हवामान भीषण होते, जवळजवळ चार तास सतत पाऊस पडत होता.
मी गोल्फ कोर्स रोडजवळ राहते – हा परिसर डीएलएफ कॅमेलियासारख्या उच्चभ्रू इमारतींसाठी ओळखला जातो, जिथे घरं १०० कोटी रुपयांना विकली जातात. पण, हे गुरुग्रामचे भीषण वास्तव आहे. मी कामावरून घरी परतले तेव्हा मला माझी गाडी पाण्यात अर्धी बुडालेली आढळली; पण त्याहीपेक्षा घरातील स्थिती पाहून मी खूप दुखावले गेले.
हे माझे घर आहे. मी राहायला आल्यानंतर ते काळजीपूर्वक आणि प्रेमाने सजवले होते. पण आज माझ्या घरातील फर्निचर, सामान पाण्याच तरंगत होते, भिजत होते आणि खराब होत होते. माझ्याकडे त्यासाठी शब्द उरले नाहीत. फक्त वेदना. फक्त अविश्वास. हे फक्त पाण्यामुळे झालेले नुकसान नाही, तर हे भावनिक नुकसान आहे, अशा शब्दांत तिने आपली दु:खदायक भावना व्यक्त केली आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, घराचा अर्धा भाग पाण्यात बुडालेला आहे आणि त्यामुळे वस्तूही पाण्यात भिजल्या आहेत. घरात प्रवेश करताच, ड्रॉईंग रूमपासून ते जमिनीवर पडलेल्या वस्तूंपर्यंत सर्व काही पाण्यात तरंगताना दिसतेय. तसेच सोफ्यापासून ते बेडपर्यंत सर्व काही पाण्यात बुडाले आहे. तिचे बूट आणि सॉफ्ट टॉयदेखील पाण्यात दिसतात.
त्याशिवाय व्हिडीओच्या एका भागात, जेव्हा ती गाडीचा दरवाजा उघडते आणि बाहेरची परिस्थिती दाखवते, तेव्हा बाहेर रस्त्यावरही पाणी भरलेले दिसतेय. पावसामुळे झालेल्या या परिस्थितीवर आता अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिले की, हे खरोखरच तणावपूर्ण आहे. दुसऱ्या युजरने म्हटले की, सुदैवाने आम्ही गुरुग्राममध्ये घर खरेदी केले नाही. द्वारका हा सर्वोत्तम पर्याय आहे. काळजी घ्या, मी तुमची परिस्थिती समजू शकतो.
चौथ्याने लिहिले की, जर कोणाकडे १० कोटी किंवा त्याहून अधिक पैसे असतील, तर त्याने परदेशात जावे. कर भरा आणि सन्मानाने व सुरक्षिततेने जीवन जगा. भारताला दिशा नाही. योजना फक्त कागदावर आहेत. सामाजिक विभागणी आहे आणि प्रचंड भ्रष्टाचार आहे. प्रत्येक राजकारणी सारखाच आहे.