भारत यंदा स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने यानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’अंतर्गत वेगवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. याच कार्यक्रमांमध्ये ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचाही समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी सर्व भारतीयांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित हा उत्सव १३ ते १५ ऑगस्टदरम्यान साजरा होणार असला तरी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला २ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. मोदींनी याच दिवशी स्वत:चा डिस्प्ले फोटो म्हणजेच डीपी बदलला. त्याचबरोबर त्यांनी देशातील लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील डिस्प्ले फोटो म्हणजेच डीपी म्हणून तिरंग्याचा फोटो ठेवण्याचं आवाहन केलं. याच सर्व पार्श्वभूमीवर भाजपाची मातृक संस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरील फोटो बदलून तिरंगा डीपी ठेवला आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी १५ ऑगस्टचीच निवड का केली? जाणून घ्या यामागील महत्त्वाचं कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डीपी बदलण्याचं आवाहन केल्यापासून अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आपला ट्विटर तसेच फेसबुकवरील डीपी बदलला. त्याचबरोबर राज्यामधील अनेक भाजपाच्या नेत्यांनी आपआपल्या सोशल मिडिया अकाऊट्सवरील डीपी बदलत तिरंगा डिपी म्हणून ठेवला. असं सगळं असतानाच विरोधकांकडून मात्र सातत्याने भाजपाची मातृक संस्था असणाऱ्या आरएसएसच्या अधिकृत खात्यांचा डीपी कधी बदलला जाणार असा प्रश्न विचारला जात होता.

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनीही ट्विटरवरुन हर घर तिरंगा मोहिमेमवरुन संघाला टोला लगावला होता. आत्ता हर घर तिरंगा मोहीम चालवणारे अशा संस्थेचा भाग आङेत ज्यांनी ५२ वर्ष तिरंगा फडकवला नव्हता. काँग्रेस स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरली होती तेव्हाही त्यांना आम्हाला रोखता आलं नव्हतं आणि आताही रोखता येणार नाही, अशा अर्थाचं ट्विट राहुल यांनी केलं होतं. याच मुद्द्यावरुन पवन खेरा आणि खासदार जयराम रमेश यांनी मोहन भागवत आणि संघावर टीका केली होती. ज्यांनी ५२ वर्षे तिरंगा फडकवला नाही ते डीपी कसा बदलणार? अशा अर्थाचा खोचक सवाल या दोघांनी संघाला विचारला होता.

नक्की वाचा >> विश्लेषण : ‘हर घर तिरंगा’ मोहीम आहे तरी काय? यामध्ये कसं सहभागी व्हायचं? यात सहभागी झाल्याचं प्रमाणपत्र कसं मिळतं?

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डीपी बदलणार का याबद्दल उत्सुकता लागून राहिलेली असतानाच आज संघाच्या अधिकृत हॅण्डल्स बरोबरच सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आपल्या अकाऊंटचा डीपी बदलल्याचं पहायला मिळालं.

पीटीआयने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पब्लिसिटी विभागाचे सह संचालक नरेंद्र ठाकूर यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार संघाच्या माध्यमातून देशभरामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय. तसेच संस्थेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्सवरही संस्थेच्या झेंड्याऐवजी तिरंगा झेंड्याचा फोटो लावण्यात आला आहे, असंही ठाकूर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“संघाने आधीच हर घर तिरंगा आणि आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांना पाठिंबा दर्शवला आहे. संघाने जुलै महिन्यामध्येच सरकार आणि खासगी संस्थांच्या माध्यमातून आणि संघाशी संबंधित संस्थांच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांसाठी स्वयंसेवकांच्या माध्यमातून मदत करण्यासाठी पाठिंबा दर्श्वला होता,” असं संघाचे प्रचार प्रमुख सुनिल अंबेकर यांनी म्हटलं आहे.