बऱ्याचदा तुम्ही पाळीव कुत्री आणि मांजरे यांच्यावर प्रेम व्यक्त करणाऱ्या तरुणींना पाहिल असेल. त्यामुळे मुक्या प्राण्यांना गोंजरणाऱ्या तरुणी या प्राण्यांची हत्या करु शकतील असा विचार तुमच्या मनात कधीच येणार नाही. मात्र रशियातील तरुणींनी प्रत्येक गोष्टीला अपवाद असल्याचे दाखवत मुक्या प्राण्यांची हत्या करुन क्रुरतेचे दर्शन करुन दिले. रशियातील दोन तरुणींनी जनावरांना अमानुषपणे मारल्याचे समोर आले आहे. या तरुणींनी केलेले हे कृत्य धक्कादायक अाहे. पण त्यांनी हे सर्व लोकप्रियतेसाठी केल्याचे समजते तेंव्हा त्यांच्याबद्दल अधिक तिरस्कार निर्माण होतो. लोकप्रियता मिळविण्यासाठी या तरुणींनी प्राण्यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यानंतर तरुणींनी रक्ताने माखलेल्या धारदार शस्रासह जनावरांचे फोटो सोशल मीडियामध्ये लोकप्रिय असणाऱ्या फेसबुकच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घटना समोर आल्यानंतर दोन्ही तरुणींना रशियन पोलिसांनी अटक केली. अलीना ओरलोवा आणि तिची मैत्रीण क्रिस्टीना हेम्प अशी या तरुणींची नावे असून त्यांनी आपल्या फेसबुक अकांऊटवरुन जनावरांच्या हत्येचे फोटो शेअर केले होते. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघींनी एका मांजराच्या गळ्याला चाकू लावल्याचे दिसत आहे. तर एका कुत्र्याला भिंतीला टांगून बंदूकीच्या साहय्याने त्याच्यावर निशाणा साधण्यात आल्याचे दिसते. एका फोटोमध्ये अनेक मृत जनावारांचे देखील दर्शन घडते. तरुणींनी फेसबुकच्या माध्यमातून आपली क्रुरता दाखवून दिल्यानंतर स्थानिक लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल रोष निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी या तरुणींना कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.