स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्याच्या एका चुकीमुळे तब्बल दीड कोटी रुपये चुकीच्या खात्यांवर ट्रान्सफर केले गेले. एका अहवालानुसार, एसबीआय कर्मचाऱ्याच्या कॉपी-पेस्टच्या चुकीमुळे दलित बंधू योजनेचा निधी चुकून लोटस हॉस्पिटलच्या १५ कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला. लोटस हॉस्पिटलच्या या कर्मचाऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी १० लाख रुपये जमा झाले. मात्र, हा निधी तेलंगणा सरकारच्या दलित बंधू कल्याणकारी योजनेसाठी होता.

हैदराबादमधील सैफाबाद पोलिसांनी सांगितले की, एसबीआय रंगारेड्डी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने २४ एप्रिल रोजी चुकून दीड कोटी रुपये चुकीच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. ज्या पंधरा जणांच्या खात्यात प्रत्येकी १० लाख रुपये जमा झाले त्यातील १४ जणांनी हे पैसे परत केले. मात्र महेश नावाच्या लॅब टेक्निशियनने हे पैसे परत पाठवले नाहीत.

ऑनलाइन फसवणूक झाली आहे? ‘हे’ सोपे काम करून तात्काळ परत मिळवता येणार पैसे

“चूक लक्षात येताच बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना बोलावून रक्कम परत करण्यास सांगितले. १४ कर्मचार्‍यांनी पैसे परत केले. मात्र, लॅब टेक्निशियन महेश फोनवर उपलब्ध नसल्याने त्याने पैसे पाठवले नाहीत.” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले असल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

महेशला असे वाटले की एखाद्या सरकारी योजनेअंतर्गत त्याच्या खात्यात १० लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे त्याने आपले कर्ज फेडण्यासाठी त्यातील काही रकमेचा वापर केला. “वारंवार विनंती करूनही तो पैसे परत करत नव्हता. परिणामी, बुधवारी, बँक अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आणि महेश विरुद्ध आयपीसीच्या कलम ४०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला,” वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आता अ‍ॅप न उघडताच होणार पेमेंट; जाणून घ्या Google Pay चे नवे फीचर

गंमत म्हणजे, सैफाबाद पोलिसांनी महेशविरुद्ध गुन्हा दाखल केलाच, मात्र ज्या एसबीआय कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे संपूर्ण गोंधळ झाला त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. महेशने ६ लाख ७० हजार रुपये परत केले आहेत, पण तरीही अद्याप बँकेचे ३ लाख ३० हजार रुपये बाकी आहेत. बँक कर्मचाऱ्याच्या कॉपीपेस्टच्या एका चुकीमुळे या सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागला असल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटले.